बंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात गुरुवारी (६ जानेवारी) पहिला सामना तमिल थलाइवाज व पटना पायरेट्स या संघांमध्ये खेळला गेला. पहिल्या मिनिटापासून बरोबरीच्या राहिलेल्या सामन्यात चाहत्यांना आणखी एक टाय पाहायला मिळाला.
सामन्याच्या सुरुवातीला पटना संघ काहीसा माघारला होता. मात्र, इराणीयन डिफेंडर रेझा याने सुपर टॅकल करत पटनाला बरोबर येत आणले. त्यानंतर, त्यांनी सातत्याने गुण घेत पहिल्या हाफमध्ये आघाडी मिळवली. मध्यंतराला खेळ १८-१२ असा पटना संघाच्या बाजूने होता. मोनू गोयतने पहिल्या हात मध्ये रेडींग व डिफेन्स दोन्हीमध्ये योगदान दिले.
पहिल्या हाफमध्ये तब्बल सहा गुणांनी पिछाडीवर पडलेल्या तमिल थलाइवाज संघाने दुसऱ्या हाफमध्ये कमालीचा आक्रमक खेळ केला. डिफेंडर आणि रेडर यांनी एकमेकास पूरक खेळ करत दुसऱ्या हाफच्या पहिल्या दहा मिनिटात पिछाडी भरून काढत दोन गुणांची आघाडी घेतली. त्यानंतर दोन्ही संघांनी कमालीचा सातत्यपूर्ण खेळ केला व एकमेकाला वरचढ होऊ दिले नाही. अखेरच्या दीड मिनीटात दोन्ही संघांनी संयमी खेळ करत जोखीम न घेता सामना ३०-३० असा बरोबरीत सोडवला. तमिल थलाइवाज संघाचेही स्पर्धेतील चौथी बरोबरी आहे.