संपुर्ण नाव- यलाका वेणुगोपाल राव
जन्मतारिख- 26 फेब्रुवारी, 1982
जन्मस्थळ- विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश
मुख्य संघ- भारत, आंध्र प्रदेश, डेक्कन चार्जर्स, दिल्ली डेअरडेविल्स, गुजरात, भारत अ, भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, मद्रास रबर फॅक्टरी, राजस्थान क्रिकेट असोसिएशन अध्यक्षयी एकादश आणि सनराइजर्स हैद्राबाद
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज (फिरकीपटू)
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 30 जुलै, 2005
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 16, धावा- 218, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-वेणुगोपाल राव याचा जन्म आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीलगतच्या शहरात झाला.
-त्याचा भाऊ ज्ञानेश्वर राव याने देशांतर्गत स्तरावरील क्रिकेट खेळले आहे. तसेच त्यांनी आयपीएलच्या कोची टस्कर्स केरळ संघाकडूनही क्रिकेट खेळले आहे.
-उजव्या हाताने खेळणाऱ्या वेणुगोपालने वयाच्या 10व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तो सचिन तेंडूलकरला खेळताना बघत मोठा झाला. तर, त्याने त्याची फलंदाजी शैली व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या शैलीला पाहून शिकली.
-2000 सालच्या 19 वर्षांखालील विश्वचषकातील कामगिरीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधले होते. यावेळी युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांनी वेणुगोपालच्या वरिष्ठ भारतीय संघातील स्थानासाठी पसंती दाखवली होती. पण तरीही त्याला भारतीय संघात प्रवेश मिळण्यासाठी 5 वर्षे वाट पाहावी लागली होती.
-वेनुगोपालच्या क्रिकेट कारकिर्दीतील मोठा क्षण 2002-03 साली त्याच्या 22व्या वाढदिवसाच्या 2 दिवसांपुर्वी दुलीप ट्रॉफीत आला होता. यावेळी इंग्लंडविरुद्ध दक्षिण विभागाकडून खेळताना वेनुगोपालने 228 धावांची मोठी खेळी केली होती. त्यामुळे दक्षिण विभागाने तो सामना 6 विकेट्सने जिंकला होता.
-दुलीप ट्रॉफीतील त्याच्या उत्कृष्ट खेळीने त्याला 2005 सालच्या श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघात स्थान मिळवून दिले होते. त्याने वनडे पदार्पणाच्या सामन्यात त्याने 38 धावा केल्या होत्या. हा सामना भारताने 3 विकेट्सने गमावला होता.
-वेणुगोपालला राहूल द्रविड आणि रॉबिन सिंग यांच्या फलंदाजी शैलीतील दुवा समझले जात होते. तो सपाट क्रिजवरती फिरकी गोलंदाजीचा सामना करण्यात माहीर होता.
-वेणुगोपालने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी पाकिस्तानविरुद्धच्या वनडेत केली होती. यावेळी त्याने नाबाद 61 धावा केल्या होत्या. मात्र, भारताने तो सामना 6 विकेट्सने गमावला होता.
-वेणुगोपालने त्याच्या 18 वर्षांच्या देशांतर्गत कारकिर्दीत 7000हून अधिक धावा केल्या होत्या.
-वेणुगोपाल 2008 साली आयपीएलच्या डेक्कन चार्जर्सचा भाग होता.त्यांच्यासाठी त्याने 2009च्या आयपीएल विजयातही त्याचा मोलाचा वाटा होता.
-पुढे 2011 मध्ये दिल्ली डेअरडेविल्सने त्याला 70 लाखांना तर 2014मध्ये सनराइजर्स हैद्राबादने त्याला 55 लाखांना विकत घेतले होते. त्यापुढील हंगामापासून त्याने आयपीएल खेळले नाही.
-त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील दुखापतींमुळे तो सर्वाधिक वेळा जखमी होणारा भारतीय क्रिकेटपटू म्हणूनही ओळखला जातो.
-वेणुगोपालने क्रिकेटमधील निवृत्तीनंतर 2018मध्ये पवन कल्याणच्या जनसेना पक्षात प्रवेश केला.