भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर – गावसकर मालिकेमध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक मालिका विजय मिळवला आहे. भारताकडून या मालिकेमध्ये देखील चेतेश्वर पुजाराने उत्तम कामगिरी केली आहे. अनेक महत्त्वाच्या वेळी पुजाराने एका बाजूला भिंती प्रमाणे उभे राहून संघाला सावरले. पुजाराने या मालिकेमध्ये उत्तम कामगिरी करत एका अनोख्या यादीत स्थान मिळवले आहे.
पुजारा 2010 नंतर ऑस्ट्रेलियात सर्वाधिक चेंडू खेळण्याच्या बाबतीत दुसर्या क्रमांकावर पोहोचला आहे. 2010 नंतर ऑस्ट्रेलियात सर्वाधिक चेंडू इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कुकने खेळले. कुकने ऑस्ट्रेलियात 2725 चेंडू खेळलेले असून या वेळी प्रत्येक डावात चेंडू खेळण्याची त्याची सरासरी 105 चेंडूंची आहे. द्वितीय क्रमांकावर चेतेश्वर पुजारा असून, पुजाराने 2657 चेंडू खेळलेले आहेत.
विशेष म्हणजे एका डावात चेंडू खेळण्याच्या सरासरीत पुजाराने कुकला देखील मागे पडले आहे. पुजाराची सरासरी 127 चेंडूची आहे.तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर देखील दोन भारतीय दिग्गज असून 2544 चेंडू सह विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर व 1653 चेंडूसह अजिंक्य राहणे चौथ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा वर्तमान कर्णधार जो रूट 1348 चेंडू सह पाचव्या क्रमांकावर आहे.
पुजाराने ब्रिस्बेन कसोटीच्या शेवटच्या दिवशी देखील आपली उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. पुजाराने 211 चेंडू खेळत 56 धावा केल्या. पुजाराच्या साथीने रिषभ पंतला आक्रमक खेळ खेळण्याची संधी मिळाली व दोघांच्या उत्तम भागीदारीमुळे भारताने ब्रिस्बेन कसोटी सामना जिंकून ऐतिहासिक मालिका विजय मिळवला आहे.
महत्वाच्या बातम्या:
केव्हिन पीटरसनचे चक्क हिंदीत ट्विट, या कारणासाठी दिला भारताला सावधगिरीचा इशारा