पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पंजाबी विद्यापीठ पटियाला संघांनी चुरशीचे विजय मिळवून येथे सुरू असलेल्या एसएनबीपी २८व्या नेहरु अखिल भारतीय विद्यापीठ हॉकी स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला.
पिंपरीत नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद मैदानावर झालेल्या सामन्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने एकतर्फी लढतीत बनारस हिंदू विद्यापीठ संघाचा १०-० असा पराभव केला. स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलेल्या पंजाबी विद्यापीठ संघाला मात्र एसआरएम विद्यापीठ संघाचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला. त्यांनी ४-३ असा निसटता विजय मिळविला.
पंजाबी विद्यापीठाचे २ सामन्यात ६ गुण झाले असून, पुणे विद्यापीठाचे तीन सामन्यात सहा गुण झाले आहेत. त्यांनी सी गटातून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी या गटातून एसआरएम विद्यापीठ (३ गुण), बनारस हिंदु विद्यापीठ संघ (शून्य गुण) यांचे आव्हान गटातच संपुष्टात आले. भारतीय विद्यापीठ संघटना आणि हॉकी इंडिया यांच्या सहकार्याने ही स्पर्धा सुरू असून, एसएनबीपी संस्था समूह या स्पर्धेचे प्रायोजक आहेत.
स्पर्धेच्या बाद फेरी प्रवेशासाठी पुणे विद्यापीठ संघाला विजय आवश्यक होता. राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या तालेब शाह याने पाच गोल नोंदवून विजयात महत्वाचा वाटा उचलला. कर्णधाराला साजेसा खेळ करताना त्याने १७, २६, ३५, ४२ आणि ४९व्या मिनिटाला गोल केले. त्याला प्रज्वल मोहरकर याने तीन गोल करून सुरेख साथ केली. त्यांच्या खेळाने पूर्व विभागातून चौथ्या स्थानाने या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या बनारस विद्यापीठ संघाला निष्प्रभ केले. गुरफान शेख आणि करण दुर्गा यांनी अनुक्रमे ५४ आणि ५६व्या मिनिटाला गोल करून संघाचा मोठा विजय साकार केला.
सी गटातील अन्य एका सामन्यात पंजाबी विद्यापीठ संघाने कमालीच्या संयमाने खेळ करताना मुसंडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एसआरएम संघाचे सामन्यात परतण्याचे सारे दरवाजे बंद केले. मायकेल टोपनोने १३व्या आणि हरमीतने ३५व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडीवर नेले होते. मात्र, दोन्ही वेळा त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले. प्रथम २०व्या मिनिटाला जीवा कुमार आणि नंतर ३९व्या मिनिटाला एम. हरिहरन याने गोल करून एसआरएम संघाला बरोबरी साधून दिली. पुढच्याच मिनिटाला बी. अमित याने गोल करून संघाला आघाडीवर नेले. मात्र दोन मिनिटांत दोन गोल करून पंजाबी विद्यापीठाने बाजी मारली. प्रतिआक्रमण करताना महकदीप सिंगने ४८व्या मिनिटाला मिळालेला कॉर्नर सत्कारणी लावला. त्यानंतर ५०व्या मिनिटालसा सुरज कुमारने मैदानी गोल केला.
ड गटात अजूनही बाद फेरी पात्रतेचे चित्र स्पष्ट नाही. गतविजेते एमजी काशी विद्यापीठ आणि लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ यांच्यातील सामना ३-३ असा बरोबरीत सुटला, तर बंगळूर विद्यापीठाने मुंबई विद्यापीठावर २-१ असा विजय मिळविला.
अत्यंत चुरशीच्या सामन्यात लव्हली विद्यापीठ संघाला बॉबी धमी सिंग याने १९व्या मिनिटाला आघाडीवर नेले. त्यानंतर चारच मिनिटाला अमित कुमार यादव याने काशी विद्यापीठाचे खाते उघडले आणि त्यानंतर विष्णू कांत सिंग याने ३०व्या मिनिटाला संघाला आघाडीवर नेले. सामन्याच्या उत्तरार्धात लव्हली विद्यापीठ संघाला आकाशदीपने ४२व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली आणि ५१व्या मिनिटाला भूषण शर्माने आघाडीवर नेले. मात्र, सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना काशी विद्यापाठीला संधी चालून आली. त्यांना पेनल्टी स्ट्रोक मिळाला आणि धनंजय मैतेईने ५५व्या मिनिटाला ही संधी साधून सामना बरोबरीत राहिल याची काळजी घेतली.
याच ड गटातील दुसऱ्या सामन्यात बंगळूर विद्यापीठ संघाने दोन पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावत मुंबईचे आव्हान परतवून लावले. पूर्वार्धात ३०व्या आणि उत्तरार्धात ४२व्या मिनिटाला मिळालेल्या कॉर्नरचे महंमद फहाद याने गोलात रुपांतर केले. मुंबईसाठी एकमात्र गोल ४७व्या मिनिटाला भिम बहादूर बाटला याने केला.
ड गटातून आता लव्हली विद्यापीठाचे २ सामन्यातून ४ गुण झाले असून, काशी विद्यापीठाचे तेवढेच गुण असले, तरी त्यांचे तीन सामने झाले आहेत. बंगळूर विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ संघाचे प्रत्येकी दोन सामन्यातून तीन गुण झाले आहेत.
निकाल-
सी गट – सावित्राबाई फुले विद्यापीठ पुणे १० (प्रज्वल मोहरकर ७, २९ आणि ३१वे मिनिट, तालेब शाह १७, २६, ३५, ४२ आणि ४९वे मिनिट, गुरपान शेख ५४वे, करण दुर्गा ५६वे मिनिट) वि.वि. बनारस हिंदु विद्यापीठ, वाराणसी ० (मध्यंतर ४-०)
पंजाबी विद्यापीठ, पतियाळा ४ (मायकेल टोपनो १३वे, हरमीत सिंग ३५नवे, महकदीप सिंग ४८वे, सुरज कुमार ५०वे मिनिट) वि.वि. एसआरएम विद्यापीठ चेन्नई ३ (जीवा कुमार २०वे, एम. हरिहरन ३९वे, बी. अमित ४०वे मिनिट) (मध्यंतर १-१)
ड गट – महात्मा गांधी काशी विद्यापीठ, वाराणसी ३ (अमित कुमार यादव २३वे, विष्णु कांत सिंग ३०वे, धनजंय मैतेई ५५नवे मिनिट) बरोबरी वि. लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, फगवाडा ३ (बॉबी धमी सिंग १९वे, आकाशदीप सिंग ४२वे, भूषण शर्मा ५१वे मिनिट) (मंध्यतर २-१)
बंगळूर विद्यापीठ, बंगळूर २ (महंमगद फहाद ३० आणि ४२वे मिनिट) वि.वि. मुंबई विद्यापीठ १ (भिम बहादूर बाटला ४७वे मिनिट)
बाद फेरीसाठी पात्र संघ
– अ गट – गुरुनानक देव विद्यापीठ, अमृतसर ७ गुण, व्हीबीएसपी विद्यापीठ जौनपूर ६ गुण
– ब गट – बंगळूर सिटी विद्यापीठ, बंगळूर ६ गुण
– सी गट – पंजाबी विद्यापीठ, पतियाळा ६ गुण, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे ६ गुण
महत्त्वाच्या बातम्या-
बेंगलोर सिटीकडून पारूल विद्यापीठचा १९ गोलने धुव्वा
पंजाबकडून पुणे विद्यापीठाला पराभवाचा धक्का; लव्हली विद्यापीठाकडून मुंबई विद्यापीठ पराभूत