मागील काही दिवसांमध्ये अनेक खेळाडूंनी आपापल्या देशात पसरलेल्या कोरोना व्हायरसपासून बाधित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी हातभार लावला आहे. यामध्ये त्यांनी आपल्या ऐतिहासिक सामन्यांमधील क्रिकेटच्या वस्तूंचा लिलाव केला होता. अशाच प्रकारे पाकिस्तानचा फलंदाज अझर अलीनेही आपल्या बॅटचा लिलाव केला होता.
या लिलावात अझरची बॅट पुण्यातील ब्लेड्स ऑफ ग्लोरी (Blades of Glory) या क्रिकेट संग्रहालयाने विकत घेतली आहे. याव्यतिरिक्त अझरने कोरोना व्हायरसपासून बाधित लोकांच्या मदतीसाठी आपल्या आठवणीतील वस्तूही या लिलावात ठेवल्या होत्या.
यामध्ये त्याच्या बॅटचाही समावेश होता. या बॅटने अझरने (Azhar Ali) २०१६मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध युएईमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात नाबाद ३०२ धावा केल्या होत्या. त्यावेळी तो दिवस- रात्र कसोटी सामन्यात त्रिशतक ठोकणारा जगातील पहिला फलंदाज बनला होता.
तसेच त्याने २०१७मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध घातलेली जर्सीचादेखील या लिलावात समावेश केला होता. या बॅट आणि जर्सीवर पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सर्व सदस्यांची स्वाक्षरी होती.
अझरने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटले होते की, “हा शर्ट २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील आहे. जो आम्ही जिंकलो होतो. यावर त्या संघातील सर्व खेळाडूंची स्वाक्षरी आहे.”
३५ वर्षीय अझरने सोशल मीडियावर घोषणा केली की, त्याने बॅट आणि जर्सीमधून प्रत्येकी १० लाख रुपयांची मूळ किंमत ठेवली होती. तसेच यामधून तो जवळपास २२ लाख रुपयांचा निधी जमविण्यात यशस्वी राहिला. त्याने याची माहिती देत म्हटले की, “पुण्यातील ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियम’ने १० लाख रुपयांची सर्वाधिक बोली लावत ही बॅट विकत घेतली.”
लिलावात ठेवलेल्या त्याच्या शर्टलागेखील लोकांनी पसंती दिली. तसेच कॅलिफोर्निया येथे राहणाऱ्या एका पाकिस्तानी काश विलानीने यासाठी ११ लाख रुपयांची सर्वाधिक बोली लावली होती. न्यू जर्सीमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी जमाल खानने एक लाख रुपयांची मदत केली होती.
अझरने लिलाव सुरु केल्यानंतर ट्वीट केले होते की, “मी सध्याच्या कोरोना व्हायरसपासून बाधित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी आपल्या खास २ वस्तूंचा लिलाव करत आहे. यांची मूळ किंमत दहा लाख पाकिस्तानी रुपये आहे. लिलाव आता सुरु झाला असून ५मे २०२० ला रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी संपणार आहे.”
अझरने आपल्या कारकीर्दीत पाकिस्तानकडून खेळताना एकूण ७८ कसोटी सामने आणि ५२ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत ४२.५८ च्या सरासरीने ५९२१ धावा केल्या आहेत. तसेच वनडेत त्याने ३६.९०च्या सरासरीने एकूण १८४५ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आयपीएलमधील हे १० विक्रम आहेत केवळ एमएस धोनीच्याच नावावर
-ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाचे मोठे पाऊल; २ आठवड्यांसाठी…
-पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचा भारतावर आरोप, मॅच फिक्सिंगचा गड आहे भारत