पुणे। सुमारे तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर अश्वशर्यतींचा थरार पुन्हा एकदा पश्चिम भारतात सुरू होत असून पुणे मान्सून अश्वशर्यतींच्या यंदाच्या हंगामाला येत्या गुरुवार, 25 जुलैपासून प्रारंभ होत आहे. हा हंगाम 26 ऑक्टोबरपर्यंत चालणार असून ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याच्या जवळजवळ प्रत्येक वीकेंडला या शर्यती रंगणार आहेत.
यंदाच्या मोसमात एकूण 23 दिवस अश्वशर्यती होणार आहेत. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (आरडब्लूआयटीसी)ला यंदाच्या मोसमात दोन ग्रुप वन अश्वशर्यतींची घोषणा करताना अतिशय आनंद होत आहे. यातील पहिली इंडियन सेंट लेजर ही शर्यत रविवार, दि.22 सप्टेंबर रोजी होणार असून रविवार, दि.13 ऑक्टोबर रोजी पुणे डर्बी होणार आहे.
यंदाच्या पुणे अश्वशर्यती हंगामासाठी एकूण 8.19 कोटी रुपयांची रक्कम पणाला लागणार आहे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब यांनी या हंगामात त्यांना पाठिंबा देणारे सर्व पुरस्कर्ते, जाहिरातदार व प्रायोजक यांचे आभार मानले आहेत.
या मोसमातील प्रमुख शर्यती व त्यांच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत:
द इंडिपेंडन्स मिलियन-प्रायोजक एसआरएस ग्रुप-गुरुवार 15 ऑगस्ट
द एफ.डी.वाडिया ट्रॉफी(ग्रेड 3)-प्रायोजक मेसर्स येरवडा स्टड अँड ऍग्रिकल्चरल फार्म-शनिवार 24 ऑगस्ट
द पंचशील मिलियन-प्रायोजक पंचशील समूह-रविवार 25 ऑगस्ट
द एस.ए. पुनावाला मिलियन (ग्रेड 3)-प्रायोजक पुनावाला ग्रुप-रविवार 15 सप्टेंबर
द विलू सी. पुनावाला मिलियन-प्रायोजक डॉ. सायरस एस. पुनावाला- रविवार 15 सप्टेंबर
द थ्रेप्टीन फिलीज अँड मेअर्स स्टेक्स(ग्रेड 3)-प्रायोजक मेसर्स रॅप्टकोज ब्रेट अँड कंपनी लिमिटेड- रविवार 6 ऑक्टोबर
द नोशीर अँड डोली धनजीभॉय स्प्रिंट मिलियन(ग्रेड 3)-प्रायोजक धनजीभॉय फॅमिली- रविवार दि 13 ऑक्टोबर(पुणे डर्बी डे)
या मोसमात अन्य प्रत्येक वयोगटातील अश्वांसाठी विविध दर्जाच्या शर्यतीसुद्धा आयोजित करण्यात येणार आहे. आरडब्लूआयटीसी या क्लबचे पुण्यातील स्थानिक लष्करी विभागाशी असलेले सहकार्य सर्वश्रुत आहे. या दोन्ही संस्थांमधील नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी क्लबने रविवार,1 सप्टेंबर रोजी सदर्न कमांड रेस डेची घोषणा केली आहे. या दिवशी सेना दलाच्या दक्षिण विभागातील(सदर्न कमांडमधील)नामवंत अधिकारी व कुटुंबियांच्या सहभागासह विशेष अश्वशर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या मोसमातील हा दिवस विशेष मानला जात आहे.
पुणे अश्वशर्यतींच्या हंगामासाठी रेडिओ पार्टनर म्हणून रेडिओ वन या वाहिनीची घोषणा करण्यात आली असून प्रत्येक आठवड्यातील सर्व शर्यतींचे धावते वर्णन रेडिओ वन वरून करण्यात येणार आहे. अत्यंत विख्यात अशा हेल्ट्न हॉटेल्स आणि रिसॉर्ट समूहातील लक्झरी ब्रँड असलेल्या आणि जगभरात 33हुन अधिक ठिकाणी अलिशान प्रॉपर्टी असलेल्या कॉनराड हॉटेल्स अँड रिसॉर्ट यांची पुणे अश्वशर्यतींच्या यंदाच्या हंगामासाठी हॉस्पिटॅलिटी पार्टनर म्हणून घोषणा करण्यात आली आहे.
या निमित्ताने कॉनराड हॉटेल्स अँड रिसॉर्ट यांच्या वतीने रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या सभासदांसाठी जुलै ते डिसेंबर 2019 या कालावधीत विशेष सवलतींचे दर आकारण्यात येणार आहे. तसेच क्लबच्या वतीने फेसबुक, ट्विटर व इंस्टाग्राम या सोशल मीडियावर सर्व शर्यतींची अपडेट सातत्याने देण्यात येणार आहे. रेस शौकिनांनी आणि पुणेकरांनी दिलेल्या भरघोस पाठिंब्याबद्दल क्लबने त्यांचे आभार मानले आहेत.
पुणे हंगामातील अश्वशर्यतींच्या तारखा:
25 व 26 जुलै 2019
3, 4, 10, 15, 16,24, 25 आणि 31 ऑगस्ट 2019
1, 7, 14, 15, 21, 22 आणि 29 सप्टेंबर 2019
5, 6, 12, 13, 25 व 26 ऑक्टोबर 2019