आयसीसी वनडे विश्वचषक 2023 नुकताच अहमदाबादमधून सुरू झाला. स्पर्धेच्या १० ठिकाणांपैकी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे एमसीए इंटरनॅशनल स्टेडियम देखील एक ठिकाण आहे आणि पुण्याचं हे स्टेडियम विश्वचषकासाठी सज्ज आहे.
शनिवारी स्टेडियमला झालेल्या पत्रकार परिषदेत एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनी विश्वचषकाला अनुसरून करण्यात आलेल्या सुधारणांची माहिती दिली.ह्याप्रसंगी पत्रकार परिषदेत उपाध्यक्ष किरण सामंत, सचिव शुभेंद्र भांडारकर, सह-सचिव संतोष बोबडे, खजिनदार संजय बजाज, सुहास पटवर्धन, विनायक द्रविड, रणजित खिरीड,सुशील शेवाळे, सुनील मुथा, राजू काणे, व मुख्य कामकाज अधिकारी अजिंक्य जोशी उपस्थित होते.
आयसीसीच्या निकषांनुसार आम्ही सुधारणा करत आहोत. स्टेडियमची आसन क्षमता ३७,०००च्या आसपास आहे. परंतु स्टेडियमची मूळ रचनाच अशी आहे की कुठल्याही आसनावरून प्रत्येक प्रेक्षकाला सामना उत्तम प्रकारे दिसेल. नुकतंच आम्ही स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून पर्यावरणाचा विचार करून चार वेळा सर्व खुर्च्या स्वच्छ केल्या आहेत, असं रोहित पवार म्हणाले.
स्टेडियमचे वॉटर प्रुफिंग पूर्ण झाले आहे तसेच रंगरंगोटीचे काम पूर्ण होत आले आहे. तसेच सर्व स्वच्छतागृहांमध्ये देखील सुधारणा केली आहे. पुण्याच्या स्टेडियमला केवळ साऊथ स्टँडला आच्छादित छप्पर आहे, पण इतर प्रेक्षकांचा विचार करून इतर स्टँड्स मध्ये देखील काही तांत्रिक बाबींचा अभ्यास करून आच्छादित छप्पर बसवण्याचे काम प्रगतीपथावर आहे, असे पवार पुढे म्हणाले.
विश्वचषकाच्या काही सराव सामन्यात पावसामुळे बराच व्यत्यय आला होता. पण अशी परिस्थिती टाळण्यासाठी एमसीए पूर्णतः सज्ज आहे. स्टेडियमची ड्रेनेज व्यवस्था अत्यंत उत्तम असून पाऊस थांबल्यानंतर केवळ ३०-४० मिनिटात पुन्हा खेळ सुरु होऊ शकतो तसेच मैदान झाकून घेण्यासाठी रोबोटिक व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
आयसीसी हे सर्व तिकिटांचे व्यवस्थापन करत आहे, त्या माहिती नुसार तीन सामन्यांची तिकिटे संपली असून, उर्वरित सामन्यांची तिकिटे देखील संपण्याच्या मार्गावर आहेत. स्टेडीयममध्ये सर्व प्रेक्षकांना मोफत पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे मात्र खाद्यपदार्थ विकत घ्यावे लागतील अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.
पार्किंगचा प्रश्न सुटणार
गहुंजे येथील स्टेडियमला जाणे-येणे प्रेक्षकांना सोयीचे जावे, तसेच पार्किंगची कुठलीही समस्या उद्भवू नये म्हणून एमसीएने कंबर कसली आहे. स्टेडियमच्या दीड किलोमीटर परिघात एकूण ४२ एकर जागा भाडेतत्वावर व सौदार्ह्यपूर्ण व्यवहारातर्फे घेण्यात आली आहे. त्या ठिकाणी एकूण ७,५०० चारचाकी आणि १५,००० दुचाकी वाहनांची पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच, प्रामुख्याने पुणे, पिंपरी-चिंचवड व मुंबई कडून येणाऱ्या प्रेक्षकांचा विचार करता पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे.
पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्थानिक प्रशासन व पोलीस, कलर कोडींग, विविध रंगी फुगे, गूगल मॅप्स आधी गोष्टींचा वापर करण्यात येणार आहे. तसेच अबालवृद्ध, लहान सोबत बालके असलेले प्रेक्षक, गर्भवती महिला ह्यांच्यासाठी ‘शटल बस’ सेवा असेल.
महत्वाच्या बातम्या –
पीएमडीटीए मानांकन ओम दळवी मेमोरियल टेनिस स्कूल ब्रॉन्झ सिरिज 2023 स्पर्धेत आयुष, विवान, रोहन यांची आगेकूच
MT ITF S400 वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत विशाल विष्णू, प्रसनजीत पॉल, आदित्य कानिटकर यांची विजयी सलामी