प्रिय सुनीत,
बालेवाडीत चेतन पाठारे याने उपविजेत्याचं नाव जाहीर केलं, तेव्हा काळजात अक्षरश: धस्स झालं. एकीकडे भारतीय शरीरसौष्ठवाच्या बाहुबलीची घोषणा झाली, पण समोरून टाळ्यांचा कडकडाट ऐकूच आला नाही. हे धस्स होणं आणि स्टेडियममधली शांतता, आमचं तुझ्याबद्दलचं प्रेम सांगत होतं. गेल्या चार वर्षात तू जे पीळदार यश संपादलंस, त्यामुळे तू अवघ्या महाराष्ट्राचा आयडॉल झालास. पण तू या पराभवाने जराही निराश होऊ नकोस. खेळात हार-जीत होतच असते. तूच जिंकणार, हा तुझा नव्हे तर आमचाही दृढ विश्वास होता. पण तू जिंकू शकला नाहीस. म्हणजे तू कमी पडलास असं मुळीच होत नाही. जिंकणारी व्यक्ती तुझ्यापेक्षा श्रेष्ठ होती, असंही नाही. बहुधा तो दिवस रामनिवासचा असावा.
एखाद्या पराभवाने खचशील इतका तू कमकुवत नक्कीच नाहीस. तू गेल्या पाच वर्षात जी कामगिरी करून दाखविली आहेस, त्याचा आम्हाला अभिमान आहे. सलग पाचवेळा महाराष्ट्र श्रीचा बहुमान संपादल्यानंतर तू भारत श्रीचीही हॅटट्रीक करावीस, अशी इच्छा तमाम मराठी बांधवांची, महाराष्ट्रवासियांची होती. ती पूर्ण झाली नाही म्हणून आम्ही कदापि निराश झालेलो नाही. कारण तू तुझं सर्वोत्तम प्रदर्शन केलंस. आम्ही ते आमच्या डोळ्यांनी पाहिलय. पण पराभवाने तू निराश झालास, दु:खी झालास, हे पाहून आम्हाला फार वाईट वाटलं. मलासुद्धा तुला भारत श्री होताना पाहायचं होतं, पण ते भाग्य यंदा लाभलं नाही.
तुझं उपविजेतेपद अनेकांना खटकलंसुद्धा. त्यानंतर तुझ्यावर प्रेम करणाऱ्या अनेक तुझ्या जीवाभावाच्या माणसांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपला रागही व्यक्त केला. काहींना वाटलं की, आपल्या जजेसनी तुझ्यावर राग काढला, काहींनी लिहीलं की तुझ्यावर अन्याय झाला… काहींनी तर हेसुद्धा म्हटले की, कुणा एका व्यक्तीला खुश करण्यासाठी हा प्रकार केला गेलाय… काहीजणं आयबीबीएफ-जजेसच्या निर्णयाबाबत समाधानी नव्हते. रामनिवासपेक्षा तूच सरस होतास असेही काहींचे मत होते, तर काहींनी रामनिवास हा तुझ्यापेक्षा किंचीत सरस होता, असेही मान्य केले. एक आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू म्हणाला की, सुनीतला किताब दिला असता तरी चाललं असतं. अशा अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताहेत. त्या येणारचं, तू या सर्वांना रोखू शकत नाहीस, पण तू भारत श्रीचे उपविजेतेपद खिलाडूवृत्तीने स्वीकारलं आहेस, हे आता त्यांना कळू दे.
आपली आयबीबीएफ संघटना खेळ आणि खेळाडूंसाठी किती जीवाचं रान करतेय, याची तुला चांगलीच कल्पना आहे. ते तुझ्याकडूनच सर्वांना कळू दे. तुझ्यावर अन्याय झालाय, असे कुणाला वाटत असेल तर त्यांना तू सांग की रामनिवासच सरस होता. आयबीबीएफ कधीच खेळाडूंवर अन्याय करीत नाही आणि आपल्याकडे विजेतेपदाचं सेटिंग कधीच केलं जात नाही. असं सेटिंग होतं असतं तर तुला 2015 साली वडाळ्यात झालेल्या महाराष्ट्र श्रीचा बहुमान दुसऱ्यांदा मिळाला नसता. त्यादिवशी एखादं शेबडं पोरंही सांगू शकलं असतं की, महाराष्ट्र श्री कोण जिंकणार. पण सलग पोझ मारून थकलेल्या संग्राम चौगुलेला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सच्या लढतीत नीट पोझही मारता आल्या नाहीत आणि जजेसनी कोणताही पूर्व इतिहास न आठवता तुला महाराष्ट्र श्री जाहीर केले होते. तेव्हा संग्रामच्या चाहत्यांनीही आरोप केले होते की, सुनीत मुंबईचा आहे म्हणून त्याच्यावर संघटना मेहेरबान झाली.
असो, सुनीत तुला 2016 ची “भारत श्री” आठवतेय का…? रोह्यात झालेल्या या स्पर्धेत तू संभाव्य विजेत्यांच्या यादीतसुद्धा नव्हतास. पण त्या स्पर्धेत 85 किलो वजनी गटात विपीन पीटरला दुसरे स्थान दिले तेव्हा सेनादलाच्या खेळाडूंनी बंड पुकारले. विपीनवर अन्याय झाला, म्हणून त्यांनी जजेस आणि आयबीबीएफविरूद्ध गोंधळही घातला. तेव्हा तुझे मत काय होते? तुझ्या चाहत्यांचे मत काय होते? याची तुलाही कल्पना असेल. तेव्हाही आयबीबीएफ आपल्या निर्णयावर ठाम राहिली आणि त्यांनी तठस्थपणे कोणालाही भीक न घालता आपला निर्णय जाहीर केला.
रोह्यातील भारत श्री स्पर्धेत तुला गटविजेतेपद आणि नंतर विजेतेपद दिल्यावर आयबीबीएफला फार मोठी किंमत मोजावी लागली होती. तू गटविजेता झालास तेव्हा सेनादलाच्या खेळाडूंना आयबीबीएफला शिव्यांची लाखोली वाहताना मी पाहिलं होतं. तेव्हा माझेही टाळके सटकले होते. हा कसला फाजीलपणा आहे ? आपल्या खेळाडूला पुरस्कार मिळाला नाही तर म्हणे पार्शिलीटी झाली… सेटिंग झाली… आपल्याच माणसाला पुरस्कार द्यायता होता तर आम्हाला कशाला बोलावलं? नसते नसते आरोप झाले होते. ज्या आयोजकांनी भारत श्रीसाठी इतका प्रचंड खर्च केला, त्यांना काय वाटलं असावं? याचा कुणी कधी विचार केला का !!!
मी तर थेट बोलतो, या साऱ्या प्रकाराला तुम्ही खेळाडूच जबाबदार आहात. शरीरसौष्ठव हाच असा एकमेव खेळ आहे, ज्यात कोणाला किती गुण मिळाले किंवा दिले गेले हे गुप्त ठेवले जाते. जगातल्या सर्व क्रीडाप्रकारात गुणांची झालेली नोंद सर्वांना दिसते. मात्र शरीरसौष्ठवात ती लपविली जाते. याबाबत कधीच कुणी आवाज उठवत नाही उठवलेला नाही. तुमच्या पोझेसच्या पॉईंट सिस्टमबद्दल जजेस किंवा संघटकांना विचारलं तर सर्वांची नेहमीच एक टेप सुरू असते.
आमचा खेळ हा आयसाईड गेम आहे. नजरेचा खेळ आहे. जो त्या क्षणाला चांगला दिसेल, त्याचीच निवड केली जाते. म्हणजे नजर हटी, दुर्घटना घटी. पण एकावेळी एका-दुसऱ्याची नजर चुकू शकते, नऊच्या नऊ जजेसची नाही ना ? जर शरीरसौष्ठवात नऊ जजेस बसत असतील, तर त्यांना प्रत्येक पोझेसला गुण देण्यास का सांगितले जात नाही ? हा मला वारंवार प्रश्न पडतो आणि या प्रश्नाचे उत्तर संघटक देणे नेहमीच टाळतात. त्यांचे उत्तर नेहमीचेच असते, आमचा नजरेचा खेळ आहे. ही त्यांची पळवाट जास्त दिवस चालू द्यायला नको.
जर जजेस तुमच्या प्रत्येक पोझेसला क्रमांक देत असतील तर ते क्रमांक तुम्हाला कळायला नको का ? कोणत्या पोझला तुम्ही पहिले आलात किंवा कोणत्या पोझला तुमचा प्रतिस्पर्धी अव्वल आला, यात लपविण्यासारखे काय आहे ? याचे कोडे मला अजूनही उलगडलेले नाही. शरीरसौष्ठव हा खेळ आहे की मतदानासारखा गुप्त प्रकार ? ज्यात मतदाराने कोणाला मत दिलेय हे कळू द्यायचे नसते. पण शरीरसौष्ठवात प्रत्येक पोझला कोणता खेळाडू कोणत्या स्थानावर आहे हे कळायलाच हवे किंवा प्रत्येक पोझला गुण देण्याची पद्धत सुरू व्हायलाच हवी. सुनीत, ही गुणपद्धत तुम्ही खेळाडू आयबीबीएफवर दबाव वाढवाल तेव्हाच सुरू होईल. किमान प्रायोगिक तत्वावर का होईना ही पद्धत जिल्हापातळीवर अमलात आणून त्याची चाचणी घ्यायलाच हवी.
जोपर्यंत तू या पद्धतीसाठी आयबीबीएफचे नाक दाबत नाही, तोपर्यंत आयबीबीएफचे शिवलेले तोंड उघडणार नाही.
आज तू उपविजेता झालास म्हणून तुझ्यावर अन्याय झाल्याची भावना तुझ्या चाहत्यांमध्ये दिसू लागलीय. सुनीत, यासाठी तुलाच पुढाकार घ्यायला हवा. जजेसची पोझेसना क्रमांक देण्याची पद्धत बंद करायलाच हवी. त्याऐवजी पोझेसना गुण देण्याची पद्धत सुरू करावी आणि ज्याला जास्त गुण तोच सरस. तसेच प्रत्येक पोझला दिले जाणारे गुणही खेळाडूंना दिसायला हवेत. यासाठी एक स्कोअरबोर्डसुद्धा स्टेजवर लावायला हवा. दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट. स्पर्धेदरम्यान तुम्हाला मिळणारी गुरांढोरांसारखी वागणूक. स्पर्धा अमूक एका वेळेत संपायलाच हवी.
पुण्यातली भारत श्री मध्यरात्री अडीचला संपली. स्पर्धेदरम्यान तासतासभर चालणाऱ्या सत्कारसोहळ्यांमुळे तुम्हाला मी एकेक तास प्राण्यांसारखं उभं राहिलेलं पाहिलं. जणू तुम्हाला उभं राहण्याची शिक्षाच ठोठावली असावी, असे वाटत होते. अंगाला क्रीम लावल्यामुळे तुम्ही कुठेही बसू शकत नव्हता आणि दुसरीकडे संघटनेचा सत्कार सोहळ्यांचा कार्यक्रम संपायचं नावच घेत नव्हता. जर तुम्हाला तुमचा मानासाठी स्पर्धा खेळावयाची असेल तर तुम्हाला संघटनेला सत्कार सोहळ्यांवर बंधन आणण्यास भाग पाडावेच लागणार. मान्य आहे की कार्यक्रमाला आर्थिक पाठबळ देणाऱ्या दानशूरांचे सत्कार आणि आभार प्रदर्शन व्हायलाच हवेत. पण त्यासाठी खेळाडूंना वेठीस धरणे कितपत योग्य आहे ? कुठेतरी वेळेचे बंधन सर्वांनीच पाळायला हवे. स्पर्धेला वेळेची शिस्त लागत नाही तोवर या खेळाचे काही खरे नाही. आणि ही शिस्त लागावी म्हणून तुम्हां खेळाडूंनीच संघटनेला धारेवर धरायला हवे.
सुनीत, निकालानंतर जजेस आणि संघटनेवर आरोप करण्याची प्रथा बंद पाडायची असेल तर तुलाच शरीरसौष्ठवपटूंना हाताशी घेऊन संघटनेला बदल करण्यास भाग पाडायला हवे. अन्यथा निकालानंतर शिव्याशाप आणि आरोप करण्याची ही प्रथा अशीच सुरू राहिल.
सुनीत, तू भारत श्रीमध्ये हरलेला नाहीस. तू फक्त दोन पावलं मागे आला आहेस. लांब झेप घेण्यासाठी नेहमीच दोन पावलं मागे जावं लागतं. आज तुझ्याकडे पाहून हजारो मुलं जिममध्ये डोले-शोले कमावण्यासाठी घाम गाळताहेत. तू त्या तरूणांसाठी आदर्श आहेस. त्यामुळे तू त्यांच्यासमोर तुझा आदर्श ठेव. पुढच्या वर्षी आणखी मेहनत करून तू तुझे जेतेपद पटकावण्यासाठी आतापासून मेहनतीला लागला असल्याचे त्यांना दाखवून दे. एका पराभवाने खचणाऱ्यापैकी तू नाहीस. कुणावर आरोप करण्याच्या भानगडीतही तू पडणार नाहीस. तू तुझ्या पीळदार स्नायूंच्या जोरावरच आपली ताकद पुन्हा एकदा अवघ्या भारताला दाखवून द्यावीस….
तुला 2019 चा भारत श्री होताना आम्हाला पाहायचेय. तू आमची इच्छा नक्कीच पूर्ण करशील, हा आमचा विश्वास आहे.
-मंगेश वरवडेकर
या लेखावर आपल्या प्रतिक्रिया देण्यासाठी-
महा स्पोर्ट्सचे ट्विटर- @Maha_Sports
लेखकाचे ट्विटर- @mumbaikarr