आयपीएल २०१७चा अंतिम सामना उद्या हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये होणार असून, हा सामना महाराष्ट्र डर्बी म्हणजेच मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपर जायंट या दोन संघांमध्ये होणार आहे. पुण्याने मुंबईलाच पहिल्या क्वालिफायर मध्ये हरवून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे तर मुंबईने दुसऱ्या क्वालिफायर मध्ये कोलकाता नाईट रायडर्सवर दणदणीत विजय मिळवून, अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. बेन स्टोक्सच्या परतीमुळे निर्माण झालेली पोकळी कोण भरून काढतं हे पहावे लागेल. या सामन्यात पुण्याला आपल्या प्रमुख खेळाडूंकडून नक्कीच जास्त अपेक्षा आहेत. पाहुयात कोण आहेत हे खेळाडू ?
५. मनोज तिवारी
मनोज तिवारी हा पुण्याच्या मधल्या फळीचा एक भरवश्याचा फलंदाज बनला आहे. या आयपीएलच्या मोसमात त्याने पुण्याकडून खेळताना ३ वेळा “एफ बी बी स्टायलिएश प्लेअर ऑफ द डे” हा किताब जिंकला आहे. १४ सामन्यांमध्ये त्याने ३५च्या सरासरीने ३१४ धावा काढल्या आहेत, ज्यात २ अर्धशतकांचाही समावेश आहे.
४. राहुल त्रिपाठी
मूळचा रांचीचा पण पुण्यात राहणारा आणि पुण्याकडून खेळणारा राहुल त्रिपाठी हा या वर्षी आयपीएलचा सर्वात मोठा उदयोन्मुख खेळाडू म्हणून उदयास आला आहे. १३ सामन्यात त्याने ३०च्या सरासरीने ३८८ धाव काढल्या आहेत, तसेच त्याचा स्ट्राईक रेट ही १५० चा आहे. त्याने या मोसमात २ अर्धशतकेही ठोकली आहेत ज्यातील कोलकाता विरुद्धच्या सामन्यात त्याने ९३ धावा काढल्या होत्या.
३. स्टिव्ह स्मिथ
रायझिंग पुणे सुपरजायन्ट संघाचा कर्णधार आणि महत्वाचा फलंदाज ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथकडून पुण्याच्या संघाला आणि चाहत्यांना खूप अपेक्षा असणार आहे. त्याने १४ सामन्यात ३८च्या सरासरीने ४२१ धाव केल्या आहेत. त्याने या संघाचं नेतृत्वही खूप चांगल्या प्रकारे केले आहे, तसेच उत्तम क्षेत्ररक्षण आणि काही सुरेख झले टिपून त्याने संघाला नेहमीच सामने जिंकण्यास मदत केली आहे.
२. जयदेव उनाडकट
भारताचा उभारता डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट हा रायझिंग पुणे सुपरजायंटसाठी या मोसमात फार महत्वाचा ठरला आहे. त्याने या मोसमात ११ सामन्यात २२ बळी घेतले आहेत, त्यामध्ये सन रायझर्स हैद्राबाद विरुद्धच्या सामन्यात घेतलेली हॅट्रिक सुद्धा समाविष्ट आहे. पुण्याला, मुंबईला कमी धावसंख्येत रोखायचे असेल तर जयदेवला चांगली गोलंदाजी करावी लागणार हे नक्की.
१. महेंद्र सिंग धोनी
भारताचा व पुण्याचा माझी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज महेंद्र सिंग धोनी हा जगात कुठल्या ही संघात सहज प्रवेश करेल असा खेळाडू आहे. बेस्ट फिनिशर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीकडून पुण्याला तशीच काहीशी अपेक्षा आहे. मागील काही सामन्यात त्याने धडाकेबाज फलंदाजी करत आपण उत्तम लयीत आहोत हे दाखवून दिले आहे. तसेच धोनीच्या अनुभवाचा ही फायदा कर्णधार स्टिव्ह स्मिथला होत आहे असे दिसून येते.
२०१७च्या आयपीएलमध्ये पुण्याने मुंबईला ३ वेळा नमवले आहे. तशीच कामगिरीकरून पुणे आपली पहिली आयपील ट्रॉफी जिंकणार का ? याकडे महाराष्ट्राचेच नाही तर भारताचे लक्ष लागून आहे.