---Advertisement---

पुणे वॉरियर्सच्या वाघिणींच्या डोक्यावर WMPL चा ताज! सोलापूर स्मॅशर्सच्या पदरी निराशा

On: रविवार, जून 15, 2025 12:42 AM
---Advertisement---

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पहिल्या वुमेन्स महाराष्ट्र प्रिमियर लीग स्पर्धेची अंतिम लढत शनिवारी (14 जून) पार पडली. या अंतिम सामन्यात पुणे वॉरियर्स आणि सोलापूर स्मॅशर्स हे संघ आमने-सामने आले होते. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात पुणे वॉरियर्सने अवघ्या एका धावेने विजय‌ मिळवला. तसेच, स्पर्धेच्या पहिल्या हंगामाचे विजेते होण्याचा मान आपल्या नावे केला.

गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे हा सामना प्रत्येकी 18 षटकांचा करण्यात आला. पुणे वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 129 अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली. पुणे संघासाठी कर्णधार अनुजा पाटील हिने सर्वाधिक योगदान देत 30 धावांची नाबाद खेळी केली. तिला अक्षया जाधव हिने 29 व श्वेता माने हिने 25 धावा करून साथ दिली. सोलापूर संघासाठी आचल अगरवाल व स्वांजली मुळे यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

विजेतेपद मिळवण्यासाठी मिळालेल्या 130 धावांचा पाठलाग करताना ईश्वरी अवसरे केवळ आठ धावा करून बाद झाली. तर, कर्णधार तेजल हसबनीस हिने आक्रमक 16 धावा केल्या. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या ईश्वरी सावकार हिलादेखील 22 धावांच्या पुढे जाता आले नाही. संघ अडचणीत असताना अष्टपैलू मुक्ता मगरे हिने जबाबदारी खांद्यावर घेतली. शाल्मली क्षत्रिय हिला सोबतीला घेत 41 धावांची भागीदारी केली. विजयासाठी 17 धावांची आवश्यकता असताना, मुक्ता वैयक्तिक 40 धावा करून बाद झाली‌. एका बाजूने शाल्मलीने आक्रमक खेळ सुरूच ठेवत सामना अखेरच्या षटकात नेला.

अखेरच्या षटकात 9 धावांची आवश्यकता असताना दुसऱ्या चेंडूवर शाल्मलीने चौकार मारत 4 चेंडू 4 धावा असे गणित आणले. पुढील दोन चेंडूवर प्रत्येकी एक धाव निघाली. पाचव्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात शाल्मलीने गोलंदाजी करत असलेल्या अनुजा पाटीलच्या हातात झेल दिला. अखेरच्या चेंडूवर दोन धावा आवश्यक असताना स्वांजली मुळे धावबाद झाली आणि पुणे संघाने विजय साकार केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---