महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये शनिवारी (14 जून) एकमेव सामना खेळला गेला. पुणेरी बाप्पा विरुद्ध पीबीजी कोल्हापूर टस्कर्स अशा झालेल्या या सामन्यात पुणेरी बाप्पाने दोन चेंडू राखून थरारक विजय मिळवला. यासह त्यांनी गुणतालिकेत दुसरे स्थान काबीज केले. अष्टपैलू रामकृष्ण घोष याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
गहुंजे येथे झालेल्या या सामन्यात पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. या सामन्यात अंकित बावणे याच्यासोबत सलामीला बदल करण्यात आला. कर्णधार राहुल त्रिपाठीने स्वतः आपली जागा युवा सचिन धस याला दिली. सचिनने मिळालेल्या संधीचा फायदा उठवत संघाला अंकित सोबत 97 धावांची सलामी दिली. सचिनने 36 चेंडूत 60 धावा कुटल्या. यामध्ये पाच चौकार व चार षटकार होते. तर अंकित याने 35 धावा बनवल्या. सिद्धार्थ म्हात्रे याने 26 तर कर्णधार त्रिपाठी याने 17 चेंडूत 45 धावांचा तडाखा दिला. या सर्व फलंदाजांच्या योगदानाच्या जोरावर कोल्हापूरने 7 बाद 186 अशी मोठी मजल मारली. पुणे संघासाठी सचिन भोसले, सोहम जमाले व रामकृष्ण घोष यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
विजयासाठी मिळालेल्या 187 धावांचा पाठलाग करताना पुण्याचे दोन्ही सलामीवीर एकेरी धावसंख्येवर माघारी परतले. त्यानंतर ऋषिकेश सोनवणे व कर्णधार यश क्षीरसागर यांनी समजदारीने 38 धावा जोडल्या. मात्र, दोघेही सलग बाद झाले. संघ अडचणीत असताना युवा अद्वय शिदये आणि अष्टपैलू रामकृष्ण घोष ही जोडी जमली. दोघांनी 52 चेंडूत 101 धावांची भागीदारी रचली. षटकार मारून सामना संपवण्याच्या नादात घोष 23 चेंडूंमध्ये 50 धावा करून बाद झाला. त्यानंतर सुरज शिंदे यांनी पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत सामना संपवला. शिदये 36 चेंडूवर 58 धावा करून नाबाद राहिला.
या विजयासह पुणे गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर, पीबीजी कोल्हापूर टस्कर्स यांचा हा तिसरा पराभव आहे. सध्या ईगल नाशिक टायटन्स सर्वाधिक पाच विजयासह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहेत.






