प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात बुधवारी (9 नोव्हेंबर) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिला सामन्यात बेंगलोर बुल्स व हरियाणा स्टीलर्स हे संघ आमनेसामने आले. बेंगलोरने शानदार खेळ दाखवत हरियाणा संघाला 36-33 असे पराभूत केले. तर, दिवसातील दुसऱ्या सामन्यात पुणेरी पलटणने मागील पाच सामन्यापासून अजिंक्य असलेल्या तमिल थलाईवाजवर 35-34 असा एका गुणाच्या फरकाने विजय मिळवला.
#FantasticPanga 𝗵𝗼 𝘁𝗼𝗵 𝗮𝗶𝘀𝗮 ♥️
The match between these two teams once again finishes at 3️⃣4️⃣-3️⃣5️⃣
This time, the Paltans reign 👑#vivoProKabaddi #CHEvPUN pic.twitter.com/LeizODKJ2M
— ProKabaddi (@ProKabaddi) November 9, 2022
बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पुणेरी पलटणचा सामना तमिल थलाईवाजशी झाला. मागील पाच सामन्यांपासून पराभूत न झालेल्या तमिल थलाईवाजने सामन्यात सुरुवातीपासून पकड मिळवली. नरेंदर गेहलोत व अजिंक्य पवार या रेडर्सना मोहित व अभिषेक हे चांगली साथ देत होते. पुणे संघासाठी केवळ डिफेंडर चांगला खेळ दाखवताना दिसले. याच कारणाने पहिल्या सत्राच्या अखेरीस तमिल थलाईवाज 7 गुणांनी आघाडीवर होते.
दुसऱ्या सत्राला सुरुवात झाल्यानंतरही तमिल थलाईवाज यांनी आपली आघाडी कायम राखली होती. पुणे संघासाठी प्रमुख रेडर अस्लम इनामदार हा सातत्याने अपयशी ठरत असल्याने, पंकज मोहिते व आकाश शिंदे या बदली खेळाडूंना मैदानात उतरवले गेले. या दोघांनी एकेरी दुहेरी गुण मिळवत पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना कर्णधार फझल अत्राचली व गौरव खत्री या डिफेंडर्सची साथ मिळाली. याचदरम्यान फझलने प्रो कबड्डी स्पर्धेत 400 डिफेन्स पॉईंट्स पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो पहिला डिफेंडर ठरला.
अखेरच्या पाच मिनिटात तमिल थलाईवाजकडे असलेली आघाडी पुणे संघाने भरून काढत तीन गुणांची आघाडी मिळवली. अखेरच्या अर्ध्या मिनिटात पुणे संघाकडे असलेली तीन गुणांची आघाडी नरेंदर गेहलोतने दोन गुण घेत कमी केली. त्यानंतर आकाशने एक गुण घेत पुण्याचा विजय जवळपास निश्चित केला. अखेरच्या तीन सेकंदात नरेंदरने दोन गुण घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो केवळ एक गुण घेऊ शकल्याने सामना पुणे संघाने आपल्या नावे केला.
(Puneri Paltan Beat Tamil Thalaivas In Pro Kabaddi 2022)