पुणे, १७ जुलै २०२३ : भारताची युवा टेबल टेनिसपटू अर्चना कामतने पुणेरी पलटण टेबल टेनिस संघाकडून खेळताना आज जागतिक क्रमवारीत ३९व्या क्रमांकावर असलेल्या सुथासिनी सवेत्तबटला पराभवाचा धक्का दिला. या विजयाच्या जोरावर पुण्यातील महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ मध्ये पुणेरी पलटण टेबल टेनिस संघाने ८-७ अशा फरकाने गोवा चॅलेंजर्स संघाचा पराभव केला. अर्चना जागतिक क्रमवारीत १५९व्या क्रमांकावर आहे आणि पुणेरी पटलण टेबल टेनिस संघाचा हा पहिलाच विजय ठरला.
कर्नाटकच्या या युवा खेळाडूने महिला एकेरीच्या अखेरच्या सामन्यात सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. तिने फोरहँडने मारलेले फटके इतके अचूक होते की सुथासिनीला पलटवार करताच आला नाही. अर्चनाने पहिला गेम ११-६ असा आणि दुसरा गेम ११-८ असा जिंकून पुणेरी पलटण टेबल टेनिसच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तिसऱ्या गेममध्ये तिला ६-११ असा पराभव पत्करावा लागला.
टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (TTFI) च्या संयुक्त विद्यमाने निरज बजाज आणि विटा दाणी यांनी प्रमोट केलेली फ्रँचायझी-आधारित लीग २०१७ मध्ये स्थापन झाल्यापासून भारतीय टेबल टेनिससाठी गेम चेंजर आहे.
गोवा चॅलेंजर्सच्या हरमीत देसाई आणि मानुष शाह यांच्यात पुरुष एकेरीचा पहिला सामना झाला आणि हरमीतने ३-० असा विजय मिळवत संघाच्या खात्यात महत्त्वाचे गुण जमा केले. गुजरातच्या दोन्ही खेळाडूंमध्ये सुरुवातीला अटीतटीचा सामना पाहायला मिळाला आणि दोघांनी आक्रमक खेळ केला. पण, हरमीतने ११-१० अशी बाजी मारली. जागतिक क्रमवारीत ६५व्या स्थानावर असलेल्या हरमीतने खेळातील सातत्य कायम राखले आणि पिछाडीवरून पुनरागमन करताना ११-९ असा हा गेम जिंकला. तिसऱ्या गेममध्ये मानुषने दमदार खेळ केला, परंतु पारडे ११-१० असे हरमीतच्या बाजूने झुकले.
महिला एकेरीच्या सामन्यात रिथ तेनिसनने २-१ अशा फरकाने हाना माटेलोव्हावर विजय मिळवून गोवा चॅलेंजर्सची आघाडी ५-१ अशी भक्कम केली. झेक प्रजासत्ताकच्या हानाने पहिल्या गेममध्ये वेगवान खेळ करून ११-३ अशी बाजी मारली. पण, भारतीय खेळाडूने पुढील दोन गेममध्ये जबरदस्त पुनरागमन केले आणि ११-१० अशी बाजी मारून सामना १-१ असा बरोबरीत आणला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये रिथने ११-३ अशी बाजी मारली.
मानुष आणि हाना यांनी मिश्र दुहेरीत हरमीत व सुथासिनी यांच्यावर ३-० असा विजय मिळवून पुणेरी पलटण टेबल टेनिस संघाला सामन्यात ५-४ असे जीवंत ठेवले. मानुष व हाना यांना पहिल्या गेममध्ये संघर्ष करावा लागला, परंतु त्यांनी ११-१० अशी बाजी मारली. दुसऱ्या गेमपासून त्यांनी पकड मजबूत केली आणि पुढील दोन्ही गेम ११-३ व ११-७ असे जिंकले.
जागतिक क्रमवारीत २३व्या क्रमांकावर असलेल्या ओमार अस्सारने चौथ्या सामन्यात ( पुरुष एकेरी) अलव्हारो रॉब्लेसवर २-१ असा विजय मिळवून सामना ६-६ असा बरोबरीत आणला. इजिप्तच्या खेळाडूने पहिला गेम गमावला, परंतु पुढील दोन्ही गेममध्ये पुनरागमन करताना त्याने ११-५ व ११-९ अशी बाजी मारली.