खेळ असो, राजकारण असो, खाण्याचे पदार्थ असो वा इतर कोणतीही गोष्ट मुंबई व पुणे ही दोन शहरे कायम एकमेकांवर कुरघोडी करत असतात. आपल्या शहराला पाठिंबा देताना पुणेकर आणि मुंबईकर कधीही कमी पडत नाहीत! पुणे आणि मुंबईमध्ये असलेली ही चुरस आपल्याला कबड्डीच्या मैदानावरही पाहायला मिळते-पुणेरी पलटण आणि यू मुम्बा यांच्यातील स्पर्धेच्या रूपात!
प्रो कबड्डीमधील सर्वात जास्त पहिल्या जाणाऱ्या सामन्यांपैकी एक म्ह्णून पुणेरी पलटण आणि यू मुम्बा यांच्यातील सामन्यांचा उल्लेख केला जातो!’ महाराष्ट्र डर्बी’ म्ह्णून प्रसिद्ध असणाऱ्या सामन्यांना महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दिली आहे. आयोजकनांही याचा अंदाज असावा म्हणूनच की काय या पर्वातील पहिल्याच दिवशी या दोघांमध्ये सामना रंगणार आहे!
या सामन्यात काय होते ते २८ तारखेला कळेलच पण तूर्तास शाब्दिक युद्धास मात्र सुरवात झाली आहे. पुण्याचे प्रशिक्षक यांनी पुण्याचा कर्णधार दिपक हा यू मुम्बाच्या अनुप कुमारपेक्षा सरस ठरेल असे विधान करत यास सुरवात केली आहे. त्यात भर घातली ती पुणे संघाचे सीईओ श्री.कैलाश कंदपल यांनी; त्यांनी या लढतीला “पुणेरी मिसळ विरुद्ध मुंबईचा वडा पाव” अशीच उपमा देऊन टाकली आहे!
आतापर्यंतच्या लढती बघितल्या तर मात्र पुण्याची मिसळ मुंबईच्या वडा पावसमोर फिकी पडली आहे असे म्हणता येईल! या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ८ सामने झाले आहेत, त्यातील ७ सामन्यांत यू मुम्बाने बाजी मारली आहे तर केवळ एका सामन्यात पुण्याला विजय मिळाला आहे.
मात्र ज्याप्रमाणे यंदा आयपीएलमध्ये पुण्याचा संघ मुंबईवर भारी पडला त्याप्रमाणेच प्रो कबड्डीमध्येही असे होऊच शकते!
पुणे संघाने आत्तापासूनच आपल्या मिसळला तर्री आणण्याचे काम चालू केले आहे. यू मुम्बाने मात्र आपल्या वडा पावची रेसिपी गुपितच ठेवली आहे! त्यामुळे पुण्याची मिसळ मुंबईकरांना रडवते की मुंबईचा वडा पाव पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळवतो हे लवकरच कळेल! ते काहीही असो शेवटी मेजवानी मात्र खवय्यांनाच मिळणार! अहो,खवय्ये म्हणजे आपण-कबड्डीप्रेमी!
– शारंग ढोमसे( टीम महा स्पोर्ट्स )