इंदोरमध्ये सध्या सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत आज(22 फेब्रुवारी) मुंबई विरुद्ध पंजाब संघात सामना पार पडला. या सामन्यात मुंबईने पंजाबवर 35 धावांनी विजय मिळवत स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला.
ही स्पर्धा आयपीएल सुरु होण्याआधी होत असल्याने या स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंकडे सर्वांचेच लक्ष आहे. त्यामुळे आज पंजाबकडून खेळणाऱ्या युवराज सिंगवरही सर्वांची नजर होती. पण त्याने सर्वांचीच निराशा केली.
या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना पंजाब समोर विजयासाठी 20 षटकात 156 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला युवराज सिंग 11 चेंडूत 7 धावा करुनच बाद झाला. या खेळीत त्याने 1 चौकार मारला. त्याला शुभम रांजणेने बाद केले.
पंजाबकडून फक्त प्रभसिमरन सिंग आणि गुरकिरतसिंग मन या दोघांनीच संघर्ष केला. अन्य फलंदाजांना मात्र दोन आकडी धावसंख्याही पार करता आली नाही. प्रभसिमरनने 20 चेंडूत 6 चौकार 4 षटकारांची आतिषबाजी करत 54 धावांची तुफानी खेळी केली. तर गुरकिरतसिंगने 24 धावा केल्या.
तसेच पंजाबकडून शुभमन गिल, कर्णधार हरभजन सिंग यांनाही चमक दाखवण्यात अपयश आले. पंजाबचा डाव 18.2 षटकातच 120 धावांवर संपुष्टात आला.
मुंबईकडून धवल कुलकर्णीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर शुभम रांजणने 2 आणि शाम मौलानी, शार्दुल ठाकूर आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी मुंबईकडूनही पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे अशा स्टार खेळाडूंनी निराशाच केली. शॉ 8 धावांवर तर रहाणे भोपळाही न फोडता बाद झाला. मुंबईकडून फक्त सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि आदित्य तरे यांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली. तर मुंबईचे तब्बल 6 फलंदाज शून्य धावेवर बाद झाले.
मुंबईकडून यादवने 49 चेंडूत 80 धावा केल्या. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 4 षटकार मारले. तर अय्यरने 40 चेंडूत 46 धावांची खेळी केली आणि तरेने 10 धावा जोडल्या.
पंजाबकडून बलतेज सिंग आणि बरिंदर स्त्रान यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर संदीप शर्माने 2 आणि मनप्रीत गोणीने 1 विकेट घेतली आणि मुंबईचा डाव 20 षटकात सर्वबाद 155 धावांवर संपुष्टात आणला.
महत्त्वाच्या बातम्या-
–आयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट
–पहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ
–विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांसाठी तब्बल ४ लाख अर्ज