पंजाब किंग्जचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक सुनील जोशी यांनी शनिवारी संघाचा कर्णधार शिखर धवनच्या दुखापतीबाबत मोठी माहिती दिली. आयपीएल 2024 चा 53 वा सामना रविवारी पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. हा सामना धर्मशाला येथे खेळला जाईल. सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत जोशी म्हणाले की, “धवननं पुनर्वसन प्रक्रियेत चांगली प्रगती दाखवली आहे. आम्ही त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे.”
शिखर धवन आगामी सामन्यांमध्ये निवडीसाठी उपलब्ध असेल. पंजाबचा कर्णधार हंगामातील शेवटच्या दोन सामन्यांसाठी तंदुरुस्त होईल, अशी आशा सुनील जोशी यांना आहे. शिखर धवननं शेवटचा सामना 9 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून तो खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर आहे.
सुनील जोशी म्हणाले, “शिखरचं सध्या पुनर्वसन जारी आहे. तो चेन्नई विरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध नाही. आम्ही त्याच्यावर बारकाईनं लक्ष्य ठेवून आहोत. तो शेवटच्या दोन सामन्यांमध्ये पुनरागमन करेल अशी आशा आहे.”
सुनील जोशी पुढे म्हणाले, “गेल्या वर्षीही हेच घडलं होतं. शिखर धवन पहिल्या पाच सामन्यांमध्ये फॉर्मात होता, मात्र नंतर तो दुखापतग्रस्त झाला आणि त्यानंतर सॅम करननं त्याच्या जागी नेतृत्व केलं. हे घडावं अशी आमची इच्छा नव्हती. तरीही, मला वाटतं की शिखरनं एक कर्णधार म्हणून चांगलं काम केलं आहे. तो संघासह एक नेता म्हणूनही उदयास आला आहे.”
पंजाब किंग्जच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, संघानं सलग विजय नोंदवून प्लेऑफच्या आशा पल्लवित केल्या आहेत. पंजाब किंग्जनं आतापर्यंत खेळलेल्या १० सामन्यांपैकी ४ सामने जिंकले असून, ६ सामन्यांमध्ये संघाचा पराभव झाला आहे. ते गुणतालिकेत ८ गुणांसह सातव्या स्थानावर आहेत. त्यांना प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी आपली विजयी लय कायम ठेवावी लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलचे ५ मोठे खेळाडू, ज्यांना या हंगामात एकदाही खेळण्याची संधी मिळाली नाही
बर्फाळ दऱ्यांमध्ये पत्नीसोबत रोमँटिक झाला ऋतुराज गायकवाड, पाहा चेन्नईच्या कर्णधाराचं हे वेगळं रुप
टी२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडू फॉर्मात परतले, तर भारतीय खेळाडू पूर्णपणे फ्लॉप!