आयपीएल 2024 च्या 69वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झाला. हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात हैदराबादनं 4 गडी राखून विजय मिळवला. लीग टप्प्यातील आपल्या शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्ज संघानं आयपीएलमध्ये एक मोठा इतिहास रचला. आयपीएलच्या 17 हंगामांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं आहे.
संघाचा नियमित कर्णधार शिखर धवन दुखापतीमुळे गेल्या बऱ्याच सामन्यांपासून संघाबाहेर आहे. त्याच्या अनुपस्थित संघाचं नेतृत्व करणारा इंग्लडचा सॅम करन देखील पाकिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी मायदेशी परतला आहे. यामुळे या सामन्यात पंजाब किंग्जचं नेतृत्व यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मानं केलं.
या सामन्यात पंजाब किंग्जच्या प्लेइंग 11 मध्ये केवळ एका विदेशी खेळाडूला संधी देण्यात आली होती. आयपीएलच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं आहे, जेव्हा एका संघाच्या प्लेइंग 11 मध्ये केवळ एका विदेशी खेळाडूला संधी मिळाली.
वास्तविक, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यापूर्वी पंजाब किंग्जचे काही खेळाडू जखमी झाले होते, तर काही खेळाडू आंतरराष्ट्रीय ड्युटीमुळे आपल्या देशात परतले होते. धवनही दुखापतीमुळे हा सामना खेळू शकला नाही. पंजाब किंग्जचे स्टार इंग्लिश खेळाडू जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन आणि ख्रिस वोक्स हे पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी रवाना झाले आहेत. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडाही जखमी होऊन मायदेशी परतला. अशाप्रकारे सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रिले रूसो हा एकमेव विदेशी खेळाडू होता ज्याला पंजाबच्या प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली.
या सामन्यात पंजाबनं यजमान संघाला विजयासाठी 215 धावांचं लक्ष्य दिलं होतं, जे त्यांनी अखेरच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पूर्ण केलं. या विजयासह सनरायझर्स हैदराबादनं गुणतालिकेत दुसरं स्थान गाठलं. तर पंजाब किंग्जचा चालू मोसमातील हा नववा पराभव असून गुणतालिकेत ते नवव्या स्थानावर राहिले.
महत्त्वाच्या बातम्या –
हैदराबादविरुद्ध टॉस जिंकून पंजाबची फलंदाजी, जितेश शर्माकडे किंग्जचं नेतृत्व; जाणून घ्या प्लेइंग 11
आधी सलग 6 पराभव…मग सलग 6 विजय! आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कमबॅकचे हे आहेत 5 शिल्पकार