आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्जचं नशीब सध्या खराब आहे. प्रीती झिंटाच्या संघानं या हंगामात शेवटच्या षटकात 4 सामने गमावले. त्यापैकी काही सामन्यांमध्ये ते विजय मिळवू शकले असते. 18 एप्रिलला झालेल्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातही पंजाबचा संघ दुर्दैवी ठरला. मुल्लानपूर येथे घरच्या मैदानावर त्यांना शेवटच्या षटकात 9 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
आयपीएलच्या या हंगामात पंजाबनं आतापर्यंत खेळलेल्या सर्व सामन्यांवर नजर टाकली तर लक्षात येतं की, पंजाबचा संघ शेवटच्या षटकात ४ सामने हरला आहे. या चारही सामन्यांमध्ये पंजाबच्या वरच्या फळीनं मध्यक्रमातील फलंदाजाचा सपोर्ट केला नाही. जर असं झालं असतं तर निकाल काही वेगळे लागले असते आणि गुणतालिकेतील पंजाबची स्थितीही वेगळी असती.
पंजाबसाठी या हंगामात शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांनी शानदार फलंदाजी केली आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यात एकेकाळी त्यांना विजयासाठी 18 चेंडूत 25 धावांची आवश्यकता होती आणि आशुतोष शर्मा क्रीजवर होता. मात्र 18व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तो बाद झाला आणि तिथून संपूर्ण सामना पलटला. मुंबईनं येथून कमबॅक करत पंजाबला ऑलआऊट केलं आणि 9 धावांनी विजय मिळवला.
25 मार्च रोजी चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धचा सामनाही पंजाबनं विजयाच्या समीप पोहचून गमावला. पंजाबला शेवटच्या षटकात 10 धावांचा बचाव करायचा होता. अर्शदीप सिंगच्या शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर दिनेश कार्तिकनं षटकार मारला. पुढचा चेंडू वाईड गेला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर कार्तिकनं चौकार मारून आरसीबीला 4 विकेटनं विजय मिळवून दिला.
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जच्या आशुतोष शर्मा आणि शशांक सिंगनं अप्रतिम खेळाचं प्रदर्शन केलं. शेवटच्या षटकात पंजाबला विजयासाठी 29 धावांची गरज होती. जयदेव उनाडकटच्या शेवटच्या षटकात आशुतोष आणि शशांकनं मिळून 27 धावा केल्या, आणि ते अवघ्या 2 धावांनी पराभूत झाले. या सामन्यात शशांकनं 25 चेंडूत 46 धावांची नाबाद खेळी केली, तर आशुतोषनं 23 चेंडूत 33 धावांची खेळी केली.
मुल्लानपूर येथे राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात रॉयल्सला शेवटच्या षटकात 10 धावांची आवश्यकता होती. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी पुन्हा एकदा अर्शदीप सिंगवर होती. त्याच्यासमोर शिमरॉन हेटमायर आणि ट्रेंट बोल्ट होते. अर्शदीपनं हेटमायरला पहिल्या दोन चेंडू निर्धाव टाकले. यानंतर हेटमायरनं तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. चौथ्या चेंडूवर त्यानं 2 धावा घेतल्या आणि पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून त्यानं संघाला विजय मिळवून दिला.
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातही पंजाब किंग्जचा शेवटच्या षटकात पराभव झाला. शेवटच्या षटकात पंजाबला विजयासाठी 23 धावांची गरज होती. मात्र त्यांच्या 9 विकेट पडल्या होत्या. पंजाबकडून कागिसो रबाडा आणि हर्षल पटेल क्रीजवर होते. मुंबई इंडियन्सकडून आकाश मधवाल गोलंदाजीसाठी आला. पहिला चेंडू वाईड गेला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर रबाड रनआऊट झाला. अशाप्रकारे मुंबई इंडियन्सनं हा सामना 9 धावांनी जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
पाच संघांवर भारी एकटा ‘हिटमॅन’! पॉवर प्ले मध्ये पाडतोय षटकारांचा पाऊस