केएल राहुलच्या नेतृत्त्वाखालील पंजाब किंग्ज संघ इतर आयपीएल संघांप्रमाणे प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आपले सर्वोत्कृष्ट देताना दिसत आहे. पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात शुक्रवार रोजी (३० एप्रिल) अहमदाबाद येथे आयपीएल २०२१ चा २६ वा सामना पार पडला. या चुरशीच्या सामन्यात पंजाबने बेंगलोरवर ‘रॉयल’ विजय मिळवला.
पंजाबच्या या विजयाचा नायक ठरला कर्णधार राहुल. तब्बल चार पराभवानंतर पंजाबने बलाढ्य बेंगलोरविरुद्ध दणदणीत विजय मिळवत शानदार पुनरागमन केले. दरम्यान कर्णधार राहुलने अर्धशतक झळकावल्यानंतर पंजाबच्या सपोर्ट स्टाफने विशेष पद्धतीने आनंद साजरा केल्याचे पाहायला मिळाले.
त्याचे झाले असे की, नाणेफेकीचा कौल बेंगलोर संघाच्या बाजूने लागल्यानंतर त्यांनी प्रथम गोलंदाजी निवडली आणि प्रतिस्पर्धी पंजाबला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यामुळे संघाला भक्कम आघाडी मिळवून देण्याच्या उद्देशाने कर्णधार राहुलने पहिल्या षटकापासूनच फटकेबाजीस सुरुवात केली. चौकार-षटकारांच्या आतिषबाजीसह अवघ्या ३५ चेंडूत त्याने हंगामातील चौथे अर्धशतक झळकावले.
अर्धशतक केल्यानंतर राहुलने हवेत बॅट उंचावत जल्लोष साजरा केलाच. परंतु स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी उपस्थित असलेले पंजाब संघाचे कर्मचारी वेगळ्या अंदाजात त्याच्या अर्धशतकाचा आनंद साजरा करताना दिसले. सर्वांनी उभा राहून आपल्या दोन्ही हाताच्या बोटांनी कान बंद करत अर्धशतकाचा जल्लोष केला. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनने सामना दर्शकांचे लक्ष वेधले आहे.
https://twitter.com/lodulalit001/status/1388157206248321031?s=20
https://twitter.com/sportzhustle/status/1388151570768961536?s=20
विशेष म्हणजे, कान बंद करत जल्लोष साजरा करण्याची ही पद्धत कर्णधार राहुलची आहे. यापुर्वी बऱ्याचदा तो अर्धशतक किंवा शतक केल्यानंतर या अनोख्या पद्धतीने आनंद व्यक्त करताना दिसला आहे.
अर्धशतक पूर्ण केल्यानंतरही बेंगलोरचे गोलंदाज राहुलच्या खेळीवर अंकुश लावू शकले नाहीत. या २९ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाजाने डावाखेर नाबाद राहत ५७ चेंडूत ९१ धावांची धुव्वादार खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५ षटकार आणि ७ चौकार मारले. यासह त्याने हंगामातील चौथे आणि आयपीएल कारकिर्दीतील २५ वे अर्धशतक नोंदवले.
महत्त्वाच्या बातम्या-
अफलातून! रवी बिश्नोईची क्षेत्ररक्षणात पुन्हा कमाल; डाईव्ह मारत घेतला नेत्रदीपक झेल, पाहा व्हिडिओ