आयपीएल 2025 पूर्वी अनेक संघांमध्ये बदल होणार असल्याची माहिती आहे. काही संघ आपला कर्णधार बदलण्याच्या विचारात आहेत, तर काही संघांचे मुख्य प्रशिक्षकही बदलले जाऊ शकतात. या दरम्यान आता पंजाब किंग्जबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. रिपोर्टनुसार, पंजाब किंग्जचे मुख्य प्रशिक्षक बदलले जाऊ शकतात. पंजाब किंग्ज त्यांचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांच्या कराराची मुदत वाढवणार नाही. संघ त्यांच्या जागी एखाद्या भारतीय प्रशिक्षकाचा शोध घेत आहे.
पंजाब फ्रँचायझीनं ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हर बेलिस यांना दोन वर्षांच्या करारावर सामील केलं होतं. बेलिस यांनी 2023 हंगामापूर्वी भारतीय दिग्गज अनिल कुंबळे यांची जागा घेतली. मात्र, त्यांच्या कार्यकाळातही संघाची कामगिरी काही विशेष झालेली नाही. या कारणास्तव त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात येणार नाही. मानलं जातं आहे की, फ्रँचायझीला बेलिस यांच्या कोचिंग स्टाईलमध्ये कोणतीही अडचण नाही, परंतु अपेक्षेप्रमाणे निकाल न मिळाल्यामुळे त्यांना बदलण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
61 वर्षीय बेलिस यांनी आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जसोबत काम केलं आहे. त्यांनी इंग्लंड संघासोबत भरपूर यश मिळवलं होतं. पण गेल्या पाच वर्षांत त्यांचा टी20 रेकॉर्ड खूपच खराब राहिला आहे. त्यामुळे पंजाब किंग्जचा संघ लवकरच मोठा निर्णय घेऊ शकतो.
अलीकडे भारतीय प्रशिक्षकांना आयपीएलमध्ये बरंच यश मिळालं आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संघ गेल्या तीनपैकी दोन हंगामात फायनलमध्ये पोहोचला आणि पदार्पणाच्या हंगामातच विजेतेपदही जिंकलं. त्याच वेळी, सध्या भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या गौतम गंभीरनंही कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक म्हणून चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या मार्गदर्शनाखील केकेआर 2024 मध्ये आयपीएल चॅम्पियन बनला होता.
याच कारणांमुळे पंजाब किंग्जलाही एका भारतीयाला मुख्य प्रशिक्षक बनवायचं आहे. क्रिकेट डेव्हलपमेंटचे संचालक म्हणून पंजाब किंग्जशी संलग्न असलेले संजय बांगर यांना संभाव्य दावेदार मानलं जात आहे. मात्र, आतापर्यंत त्यांच्या नावाबाबत फ्रेंचायझीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, बांगर यांनी यापूर्वीही या संघाचं प्रशिक्षकपद सांभाळलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आशिष नेहरा भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनण्यासाठी इच्छुक का नव्हता? समोर आलं मोठं कारण
खेळाच्या विश्वातील सुपरस्टार! या क्रिकेटपटूच्या पत्नीनं ऑलिम्पिकमध्ये जिंकली आहेत 2 पदकं
वर्ल्डकपमध्ये खराब कामगिरी, विश्नविजेता कर्णधार बनणार का इंग्लंडचा नवा मुख्य प्रशिक्षक?