इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ४८वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात मंगळवारी (दि. ०३ मे) पार पडला. हा सामना नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडिअमवर खेळला गेला. या सामन्यात शिखर धवनच्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाबने ८ विकेट्सने सामना खिशात घातला. या विजयात धवनसोबतच भानुका राजपक्ष आणि लियाम लिविंगस्टोनने मोलाचे योगदान दिले. या विजयासह पंजाबने मागच्या पराभवानंतर पुनरागमन केले. पंजाबच्या विजयानंतर कागिसो रबाडाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सामन्यात नाणेफेकीवेळी गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) सर्वांना चकित करणारा निर्णय घेतला होता. त्याने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला. यावेळी त्यांनी पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ८ विकेेट्स गमावत फक्त १४३ धावाच केल्या. यावेळी पंजाब किंग्सच्या (Punjab Kings) खेळाडूंनी पंड्याचा हा निर्णय चुकीचा ठरवला. तसेच, १४४ धावांचे हे आव्हान २ विकेट्स गमावत पूर्ण केले.
That's that from Match 48.@PunjabKingsIPL win by 8 wickets with four overs to spare.
Scorecard – https://t.co/LcfJL3mlUQ #GTvPBKS #TATAIPL pic.twitter.com/qIgMxRhh0B
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2022
पंजाबकडून फलंदाजी करताना शिखर धवनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५३ चेंडूंचा सामना करताना ६२ धावा चोपल्या. हे अर्धशतक करताना त्याने १ षटकार आणि ८ चौकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त भानुका राजपक्षने ४० धावा आणि लियाम लिविंगस्टोनने ३० धावा केल्या. लिव्हिंगस्टोनने सोळाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार खेचत संघाला विजय मिळवून दिला.
यावेळी गुजरातकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमी आणि लॉकी फर्ग्युसनने प्रत्येकी एक विकेट घेतली होती.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना गुजरातकडून साई सुदर्शनने सर्वाधिक धावांचा पाऊस पाडला. त्याने यावेळी ५० चेंडूत ६५ धावांचे योगदान दिले. या धावा करताना त्याने १ षटकार आणि ५ चौकारांचीही बरसात केली. मात्र, त्याचे अर्धशतक व्यर्थ ठरले. सुदर्शनव्यतिरिक्त फक्त वृद्धिमान साहालाच २१ धावांचे योगदान देता आले. इतर एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडा पार करता आला नाही. कर्णधार हार्दिक पंड्या तर फक्त १ धावेवरच तंबूत परतला. मागच्या सामन्यात मॅचविनर ठरलेला राशिद खान या सामन्यात शून्यावर बाद झाला.
यावेळी पंजाबकडून गोलंदाजी करताना कागिसो रबाडाने (Kagiso Rabada) सर्वाधिक विकेट्स घेण्याची मोलाची कामगिरी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ३३ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त अर्शदीप सिंग, ऋषी धवन आणि लियाम लिव्हिंगस्टोनने प्रत्येकी १ विकेट घेण्याची कामगिरी केली.
या विजयासह पंजाब किंग्स संघाने गुणतालिकेत पाचवे स्थान पटकावले आहे. तसेच, सामना गमावूनही गुजरात संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियातून ५ वर्षे बाहेर होता सॅमसन, वैतागून आवडती बॅट तोडल्यानंतर आलेला क्रिकेट सोडण्याचा विचार
गुजरात टायटन्सव्यतिरिक्त प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा दम असणारे तीन संघ, कारणही आहे तितकंच खास
मोठी बातमी! आयपीएल २०२२च्या प्लेऑफ आणि महिला टी२० चॅलेंज सामन्यांचे वेळापत्रक जाहीर