भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने सोशल मीडियावर एक पोस्ट करत चाहत्यांना गोंधळात टाकले आहे. तिने या पोस्टमध्ये ३ फोटो शेअर केले आहेत. या तीन फोटोतील पहिल्या फोटोमध्ये तिने ‘मी रिटायर होतेय. डेन्मार्क ओपन शेवटची स्पर्धा होती’ असे मोठ्या अक्षरात लिहिल्याने अनेकांचा गोंधळ उडाला. पण मात्र तिने पुढच्या फोटोमध्ये हे सर्व कोविड-१९ मुळे उद्भावलेल्या नकारात्मक परिस्थितीसाठी म्हटले असल्याचे स्पष्ट केले.
पीव्ही सिंधूने तिच्या दुसऱ्या फोटोमध्ये म्हटले आहे की ‘मी माझ्या भावनांना शुद्ध करण्याचा प्रयत्न करण्याचा विचार करत आहे. मी मान्य करते की माझ्यासाठी हे स्विकारणे संघर्षपूर्ण होते. सर्वकाही चूकीचे वाटत आहे. त्याचमुळे मी आज हे लिहित आहे की मी आता थांबण्याचा विचार करत आहे. तुम्हाला धक्का बसला असेल किंवा तुम्ही गोंधळ उडाला असेल, हे समजण्यासारखे आहे. पण जेव्हा हे तूम्ही वाचून संपवाल, तेव्हा मला आशा आहे की तुम्हाला माझा दृष्टीकोन कळेल आणि तूम्ही मला पाठिंबाही द्याल.’
‘या महामारीने माझे डोळे उघडले. मी खेळाच्या शेवटच्या शॉटपर्यंत माझ्या सर्वात कठिण प्रतिस्पर्ध्याला आव्हान देण्यासाठी खुप मेहनत घेऊ शकते. याआधीही मी हे केले आहे आणि मी पुन्हा हे करु शकते. पण संपुर्ण जगासाठी पेच निर्माण करणाऱ्या या अदृश्य व्हायरसला मी कसे पराभूत करु. अनेक महिन्यांपासून आपण घरात आहोत आणि अजूनही बाहेर जाताना आपण स्वत:ला प्रश्न विचारत आहोत. या सर्व गोष्टींचा विचार करुन आणि अनेक कथा वाचल्यामुळे मला स्वत: बद्दल आणि जगाबद्दल अनेक प्रश्न पडले. डेन्मार्क ओपनमध्ये सहभागी न होणे, ही शेवटची गोष्ट होती.’
‘आज, मी या सध्याच्या अशांततेपासून निवृत्त होत आहे. या नकारात्मकतेपासून मी निवृत्त होत आहे, सतत भीती, अनिश्चिततेपासून निवृत्त होत आहे.’
— Pvsindhu (@Pvsindhu1) November 2, 2020
सिंधूने पुढे म्हटले आहे की, ‘सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मी निकृष्ट दर्जाच्या स्वच्छतेपासून आणि व्हायरसकडे दुर्लक्ष करण्याच्या दृष्टीकोनातून निवृत्त होत आहे. आपण आत्ता चिंता करत बसू नये, तर आपल्याला तयार राहणे गरजेचे आहे. आपण एकत्र या व्हायरसचा पराभव केला पाहिजे. आज आपण जी निवड करु त्यातून आपले भविष्य ठरेल आणि आपल्या पुढच्या पिढीचे भवितव्य ठरेल.’
याबरोबरच सिंधूने पुढे म्हटले की, तिने जरी सर्वांना छोटा धक्का दिला असला तरी सर्वांनी याची नोंद घेणे गरजेचे होते. तसेच तिने म्हटले की जरी डेन्मार्क ओपन ती खेळली नसली तरी ती सराव करणे सोडणार नाही. तसेच ती एशिया ओपनसाठी सज्ज आहे.