वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक (U19 World Cup) स्पर्धेत गुरुवारी (३ फेब्रुवारी) पाचव्या क्रमांकासाठी झालेल्या प्लेऑफ सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला २३८ धावांनी पराभूत केले. या सामन्यात पाकिस्तानच्या कासिम अक्रमने (Qasim Akram) कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. त्याने शतक तर केलेच, पण ५ विकेट्ही घेतल्या. याबरोबरच त्याने मोठा विश्वविक्रम केला आहे.
कासिम अक्रमचा विश्वविक्रम
गुरुवारी झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ३ बाद ३६५ धावा केल्या. त्यांच्याकडून कासिमने आक्रमक खेळ करताना ८० चेंडूत १३ चौकार आणि ६ षटकारांसह १३५ धावांची नाबाद खेळी केली. याव्यतिरिक्त कासिमने गोलंदाजी करताना १० षटकात ३७ धावा देत ५ विकेट्स घेतल्या.
या कामगिरीसह कासिमने विश्वविक्रम केला. तो एका १९ वर्षांखालील वनडे सामन्यात शतक करणारा आणि ५ विकेट्स घेणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी असा विक्रम कोणालाही करता आला नव्हता. त्याच्या या कामगिरीमुळे या विश्वचषकात पाकिस्तान संघाने त्याच्याच नेतृत्त्वाखाली ५ व्या क्रमांकावर आपल्या अभियानाची समाप्ती केली. (Qasim Akram score 100 and take 5 wickets in a match)
https://twitter.com/ICC/status/1489448653731291140
पाकिस्तानचा दणक्यात विजय
गुरुवारी प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तान संघाकडून कासिम अक्रम व्यतिरिक्त यष्टीरक्षक फलंदाज हसिबुल्लाह खानने १५१ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह १३६ धावा केल्या. तसेच मुहम्मद शेहजादने ७३ धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून मथीशा पाथिरानाने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
अधिक वाचा – युवा टीम इंडियाचा १९ वर्षांखालील विश्वचषकात राहिलाय दबदबा! रोहितसह ‘या’ खेळाडूंच्या नावावर ऐतिहासिक विक्रम
त्यानंतर ३६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. श्रीलंकेच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर कासिमने सलामीवीर चामिंडू विक्रमसिंघे याला शुन्यावर बाद केले. त्यातून श्रीलंकेचा संघ सावरू शकला नाही आणि नियमित कालांतराने श्रीलंकेच्या फलंदाजांनी विकेट्स गमावल्या. केवळ कर्णधार दुनिथ वेललागेने ४० आणि विनुजा रानपुलने नाबाद ५३ धावांच्या खेळीसह झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण, बाकी खेळाडूंची साथ त्यांना मिळाली नाही. त्यांच्याव्यतिरिक्त श्रीलंकेकडून सादिशा राजपक्षा (१६) यालाच दोनआकडी धावसंख्या गाठता आली.
श्रीलंकेचा संपूर्ण संघ ३४.२ षटकात १२७ धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून कासिमने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
शिखरचा १८ वर्षांपूर्वीचा ‘गब्बर’ विश्वविक्रम आजही अबाधित, वाचा काय होता ‘तो’ पराक्रम
आयपीएल स्पर्धेच्या एकाच हंगामात होणार ९४ सामने, बीसीसीआयची कमाई होणार दुप्पट; खेळाडूंना किती मिळणार?






