फीफा विश्वचषक 2026 च्या क्वालिफायर सामन्यात भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय फुटबॉल टीम कतार विरुद्ध वादग्रस्त गोलमुळे पराभूत होऊन क्वॉलिफायरच्या बाहेर पडली. हा सामना कतारची राजधानी दोहामध्ये मंगळवारी (11 जून) खेळला गेला. रिप्ले पाहिल्यानंतर स्पष्ट दिसत होतं की बॉल गोलपोस्टच्या बाहेर गेला आहे. मात्र असं असूनही कतारच्या खेळाडूंनी तेथून बॉल आत ढकलून गोल मारला. भारताच्या खेळाडूंनी याविरुद्ध अपिल केलं, मात्र रेफरीनं त्यांना दाद दिली नाही.
देशाचा सर्वात महान फुटबॉलपटू सुनील छेत्रीच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाचा हा पहिलाच सामना होता. भारतासाठी लालियानजुआला चांगटे यानं 37व्या मिनिटाला पहिला गोल केला. मात्र रेफरीनं 73 व्या मिनिटाला युसूफ अयमनचा वादग्रस्त गोल वैध दिल्यानंतर कतारनं बरोबरी साधली. भारतीय खेळाडूंना वाटलं की बॉल मैदानाच्या बाहेर गेला आहे, मात्र रेफरीनं शिट्टी वाजवली नाही. कतारच्या अल हसननं बॉलला आत ढकलत अयमनकडे पास केला आणि त्यानं गोल मारला.
भारतीय खेळाडूंनी खूप विरोध केल्यानंतरही रेफरीनं गोल दिला. दक्षिण कोरियाचे रेफरी किम वू सुंग लाईनमनशी चर्चा करून आपल्या निर्णयावर कायम राहिले. फीफा विश्वचषकाच्या क्वालिफायर सामन्यांमध्ये व्हिडिओ असिस्टंट रेफरी (VAR) प्रणाली नाही, ज्याचा उद्देश मैदानावरील रेफरीला मदत करणे हा आहे.
THE DECISION WHICH ROBBED INDIA.
– Feel for team India. 🇮🇳💔pic.twitter.com/S1OlpidKrU
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 11, 2024
या गोलमुळे भारताची लय प्रभावित झाली. यानंतर आशियाई चॅम्पियन कतारसाठी अहमद अल रावीनं 85व्या मिनिटाला आणखी एक गोल करत संघाला 2-1 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. अन्य एका सामन्यात कुवैतनं अफगाणिस्तानचा 1-0 असा पराभव केला. यासह कतार आणि कुवैत पुढील फेरीसाठी पात्र ठरले, तर भारत आणि अफगाणिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं.
महत्त्वाच्या बातम्या –
यांच्यासाठी वय हा फक्त आकडा! टी20 विश्वचषकातील 4 सर्वात वयस्कर खेळाडू, ज्यांचं वय 40 वर्षांपेक्षा जास्त आहे
बांग्लादेशच्या खेळाडूचे पंचांवर गंभीर आरोप, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर सुरू झाला नवा वाद
आयसीसीच्या नियमामुळे झाला बांग्लादेशचा पराभव? पंचांच्या निर्णयानंतर गोंधळ