गुरुवारी (२३ सप्टेंबर) इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये सामना पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या मुंबई इंडियन्स संघाला २० षटका अखेर अवघ्या १५५ धावा करता आल्या होत्या. तर या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने १५.१ षटकात आव्हान गाठत ७ गडी राखून विजय मिळवला. या पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघातील एका खेळाडूच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.
या खेळाडूवर फुटले पराभवाचे खापर
आयपीएल स्पर्धा झाल्यानंतर युएई आणि ओमानमध्ये टी -२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये सूर्यकुमार यादवचे देखील नाव आहे. सूर्यकुमार यादवची गेल्या काही सामन्यातील कामगिरी पाहून त्याला टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी अंतिम १५ खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले होते. त्यामुळे श्रेयस अय्यरला राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले. परंतु, आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दोन सामन्यात सूर्यकुमार यादव पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ३ धावा केल्या होत्या. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात तो ५ धावा करत माघारी परतला होता.
सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्स संघातील मुख्य फलंदाज आहे. त्यामुळे, तो जर लवकर बाद झाला नसता तर मुंबई इंडियन्स संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले असते. सूर्यकुमारची निराशाजनक कामगिरी पाहून श्रेयस अय्यरचे समर्थक देखील नाराज झाले आहेत. कारण, सूर्यकुमार यादवला संधी मिळाल्यामुळे श्रेयस अय्यरला राखीव खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे. जर एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर त्या खेळाडूच्या जागी श्रेयस अय्यरला स्थान दिले जाऊ शकते.
श्रेयसला दुखापतीमुळे व्हावे लागले होते संघाबाहेर
याच वर्षी मार्च महिन्यात इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला होता. ज्यामुळे त्याला काही काळ क्रिकेटपासुन दूर राहावे लागले होते. परिणामी तो आयपीएल स्पर्धेतून देखील बाहेर झाला होता. परंतु स्पर्धेचा दुसरा टप्पा पुन्हा एकदा सुरू झाल्याने त्याला दिल्ली कॅपिटल्स संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. परंतु संघाचे कर्णधारपद रिषभ पंतच्या हाती देण्यात आले आहे. रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने ९ सामने खेळले आहेत,ज्यामध्ये त्यांना ७ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर दोन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.