टी२० विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीला सुरुवात झाली असतानाच आता एक मोठा वाद चव्हाट्यावर आला आहे. सर्व संघ ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर्स’ या मोहिमेला पाठिंबा देत असताना दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाच्या गोटातून धक्कादायक माहिती समोर आली. संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज व यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक याने या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी सतत मैदानावर गुडघे टेकून बसण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच तो वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात देखील सहभागी झाला नाही.
सामन्यात उतरला नाही मैदानावर
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभव पत्करावा लागल्यानंतर वेस्ट इंडीज विरुद्धचा सामना त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. मात्र, संघाचा अनुभवी फलंदाज डी कॉक याने वैयक्तिक कारणास्तव या सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी अमेरिकेतून सुरू झालेल्या ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर्स’ मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक सामन्यात गुडघे टेकून बसण्यास त्याने नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रशिक्षकांनी ही दिली होती अशी प्रतिक्रिया
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी काही दिवसांपूर्वी सर्वांचा या मोहिमेला पाठिंबा आहे. परंतु, प्रत्येक सामन्यात असे करता येऊ शकणार नाही असे म्हटलेले. मात्र, दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने या मोहिमेला पाठिंबा दिला होता. अनेक दिग्गज असे देखील म्हणताहेत की, डी कॉक याने दक्षिण आफ्रिकेसाठी आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला असून, तो पुन्हा दक्षिण आफ्रिकेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची शक्यता कमी झाली आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा संघ-
टेंबा बवुमा (कर्णधार), टेंबा बवुमा, रिझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, एडेन मार्करम, रॅसी वॅन डर डसेन, डेव्हिड मिलर, डॅन प्रिटोयरियस, केशव महाराज, कगिसो रबाडा, एन्रिक नॉर्किए व तबरेज शम्सी.