अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील तिसरा सामना पुर्नबांधणी करण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. हा सामना दिवस-रात्र सामना असून या सामन्यातील दुसऱ्या डावात जोफ्रा आर्चरला बाद करत आर अश्विनने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
भारताला पहिल्या डावात १४५ धावांवर सर्वबाद केल्यानंतर इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावातही गडगडला. इंग्लंडने २० षटाकांच्या आतच ५ विकेट्स गमावल्यानंतर आर अश्विनने ऑली पोप आणि जोफ्रा आर्चरला बाद करत आणखी दोन धक्के इंग्लंडला दिले. त्यातील डावाच्या २४ व्या षटकात आर्चरची घेतलेली विकेट अश्विनसाठी विक्रमी ठरली.
आर्चर अश्विनची कसोटी कारकिर्दीतील ४०० वी विकेट ठरला. याबरोबरच अश्विनने कसोटीमध्ये ४०० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या मानाच्या यादीत स्थान मिळवले. अश्विन कसोटीत ४०० विकेट्स घेणारा जगातील १६ वा तर भारताचा केवळ चौथाच गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी अनिल कुंबळे(६१९), कपिल देव(४३४) आणि हरभजन सिंग(४१७) या भारतीय गोलंदाजांनी हा टप्पा पार केला आहे.
अश्विनच्या दुसऱ्या डावातील विकेट्स
अहमदाबाद कसोटीत अश्विनने दुसऱ्या डावात सर्वात आधी बेन स्टोक्सला २५ धावांवर बाद केले होते. तर त्यानंतर त्याने ऑली पोपला १२ धावांवर बाद केले. त्यानंतर लगेचच त्याने आर्चरला पायचीत करत ४०० वी कसोटी विकेट साजरी केली.
आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ६०० विकेट्स पूर्ण
याच डावादरम्यान, अश्विनने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत स्टोक्सला बाद करत ६०० विकेट्स घेण्याचा कारनामाही केला. तो ६०० आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा ५ वा भारतीय ठरला आहे. त्याच्यापूर्वी अनिल कुंबळे (९५६), हरभजन सिंग (७११), कपिल देव (६८७) आणि जहिर खान (६१०) यांनी हा टप्पा पार केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
द्विशतक एक विक्रम अनेक! पृथ्वी शॉने ऐतिहासिक खेळी करत मिळवले दिग्गजाच्या यादीत स्थान
जो रूट ऑन फायर! अवघ्या ८ धावा देत बळींचा पंचक, ३८ वर्षांनंतर केला ‘तो’ हिट विक्रम
जो रूट ऑन फायर! अवघ्या ८ धावा देत बळींचा पंचक, ३८ वर्षांनंतर केला ‘तो’ हिट विक्रम