भारताचा ऑफस्पिनर आर अश्विनसाठी अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवरील इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना अतिशय खास ठरला. या सामन्याच्या दुसऱ्या डावात अश्विनने इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरला पायचीत पकडले. यासह त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील तब्बल ४००वा बळी घेतला. या बळीसह कमीत कमी कसोटी सामन्यात ४०० बळी घेणारा तो संपूर्ण क्रिकेट विश्वातील दुसरा खेळाडू ठरला.
इंग्लंडची हाराकिरी
दरम्यान, हा सामना अतिशय कमी धावसंख्येचा ठरतो आहे. पहिल्या डावात भारताच्या प्रभावी गोलंदाजीसमोर इंग्लंडचा डाव ११२ धावांवर संपुष्टात आला. या प्रत्युतरात भारताचा डावही अवघ्या १४५ धावांवर गुंडाळला गेला. मात्र दुसऱ्या डावातही इंग्लंडच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. त्यांचा दुसरा डाव अवघ्या ८१ धावांवर संपुष्टात आला. या डावात अक्षर पटेलने पाच बळी घेतले, तर आर अश्विनने चार बळी पटकावले.
मुरलीधरननंतर ४०० बळी जलदगतीने घेणारा दुसरा गोलंदाज
आर अश्विनने त्याच्या चार बळींपैकी तिसरा बळी घेत कारकिर्दीतील ४०० बळींचा टप्पा गाठला. त्याने हा टप्पा ७७व्या कसोटी सामन्यात गाठला. यासह जलदगतीने ४०० बळी घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने अवघ्या ७२ सामन्यातच हा टप्पा गाठला होता.
अश्विनपूर्वी रिचर्ड हॅडली आणि डेल स्टेन यांनी ८० कसोटी सामन्यात ४०० बळी घेतल्याने ते याआधी दुसऱ्या स्थानावर होते. मात्र आता अश्विनने त्यांना मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे. या यादीत पाचव्या क्रमांकावर श्रीलंकेचाच माजी फिरकी गोलंदाज रंगना हेराथ आहे.
कमीत कमी कसोटी सामन्यात ४०० बळी घेणारे गोलंदाज-
मुथय्या मुरलीधरन – ७२ आर अश्विन – ७७* रिचर्ड हॅडली – ८० डेल स्टेन – ८० रंगना हेराथ – ८४
दरम्यान, या सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. पहिल्या डावातील ३३ धावांची आघाडी घेतल्यानंतर त्यांनी दुसऱ्या डावात इंग्लंडला ८१ धावांवर गुंडाळले आहे. त्यामुळे भारताला शेवटच्या डावात ४९ धावांचे छोटेखानी लक्ष्य मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या:
आर अश्विन @४००! आर्चरला बाद करताच झाला या दिग्गजाच्या यादीत सामील
INDvENG 3rd Test Live: अक्षरने केला रुटचा अडथळा दूर; २० ओव्हरच्या आत इंग्लंडचा अर्धा संघ तंबुत
द्विशतक एक विक्रम अनेक! पृथ्वी शॉने ऐतिहासिक खेळी करत मिळवले दिग्गजाच्या यादीत स्थान