अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघाने १० गडी राखून इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला. दुसऱ्या दिवशीच निकाली ठरलेला हा सामना कमी धावसंख्येचा ठरला. पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी मिळालेल्या भारताने दुसऱ्या डावात इंग्लंडला एकाच सत्रात ८१ धावांवर सर्वबाद केले. त्यानंतर ४९ धावांचे सोपे लक्ष्य एकही गडी न गमावता पूर्ण केले.
त्याचवेळी भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विनसाठी हा सामना अतिशय खास ठरला. त्याने या सामन्यातील दुसऱ्या डावात जोफ्रा आर्चरला बाद करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील ४००वा बळी घेतला. त्याने आपल्या अवघ्या ७२व्या कसोटी सामन्यात हा टप्पा गाठला. यासह सर्वात जलद ४०० बळी घेणारा तो विश्वातील दुसरा गोलंदाज ठरला.
विक्रमांचे इमले
मात्र केवळ एवढेच नव्हे तर यासह इतरही अनेक विक्रम अश्विनने आपल्या नावे केले. पदार्पणानंतर कमीत कमी वर्षांत ४०० बळी घेणारा आर अश्विन दुसरा गोलंदाज ठरला. त्याने पदार्पणानंतर अवघ्या ९ वर्षे आणि १०९ दिवस या कालावधीतच ४०० बळीचा टप्पा गाठला. या यादीत पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राथ आहे. त्याने पदार्पणानंतर ८ वर्षे आणि ३४१ दिवसात हा कारनामा केला होता.
पदार्पणानंतर कमीत कमी वर्षांत ४०० बळी घेणारे गोलंदाज-
८ वर्षे ३४१ दिवस : ग्लेन मॅकग्राथ
९ वर्षे १०८ दिवस : आर अश्विन*
९ वर्षे १३७ दिवस : मुथय्या मुरलीधरन
९ वर्षे २३३ दिवस : शेन वाॅर्न
याशिवाय सर्वाधिक कमी चेंडू टाकून ४०० बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये देखील अश्विन पाचव्या स्थानी पोहोचला. त्याने २१,२४२ चेंडू टाकून ४०० कसोटी बळी मिळवले. या यादीत अव्वल स्थानी दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन आहे. त्याने केवळ १६,६३४ चेंडू टाकून ४०० बळींचा टप्पा गाठला आहे.
कमीत कमी चेंडू टाकून ४०० बळी घेणारे गोलंदाज-
१६,६३४ – डेल स्टेन
२०,४२१ – रिचर्ड हॅडली
२०,५२६ – ग्लेन मॅकग्राथ
२१,२०० – वसीम अक्रम
२१,२४२ – आर अश्विन*
२१,६९० – कर्टली अँब्रोज
महत्वाच्या बातम्या:
भारताच्या विजयानं इंग्लंडचे कसोटी चॅम्पियनशीपचं स्वप्न भंगलं; आता भारत, ऑस्ट्रेलियामध्ये चूरस
INDvENG 3rd Test : भारताचा १० विकेट्सने दणदणीत विजय, मालिकेतही मिळवली आघाडी
विक्रमादित्य अश्विन! सगळ्यात जलद ४०० बळी घेणारा ठरला विश्वातील दुसरा गोलंदाज