दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मंगळवारी (२८ सप्टेंबर) आयपीएल २०२१ चा ४१ वा सामना झाला. शारजाहच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात कोलकाता संघाने दिल्लीवर ३ विकेट्सने सोपा विजय मिळवला. या सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी संघातील आर अश्विन आणि टीम साऊथी यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यामध्ये कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉर्गन यानेही उडी घेत अश्विनला ऐकवण्याचा प्रयत्न केला. परंतु अश्विननेही शब्दांनी नव्हे तर गोलंदाजीने त्याला चांगलेच प्रत्युत्तर दिले.
झाले होते असे की, दिल्ली संघाची फलंदाजी सुरू असताना अंतिम षटकात कर्णधार रिषभ पंत आणि अष्टपैलू आर अश्विन फलंदाजी करत होते. डावातील २० वे षटक टाकण्यासाठी आलेल्या कोलकाताच्या वेगवान गोलंदाज टीम साऊथीच्या पहिल्याच चेंडूवर अश्विनला नितिश राणाच्या हातून केवळ ९ धावांवर झेलबाद केले होते. अश्विनची विकेट गेल्यानंतर साऊथी त्याला हाताने इशारा करत काहीतरी बोलताना दिसला. हे पाहून अश्विननेही त्याला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आणि त्यांच्यातील वाद वाढत गेला होता.
पुढे कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉर्गननेही यामध्ये हस्तक्षेप केला. त्यानंतर दिल्लीचा कर्णधार पंतनेही त्याच्यावर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. हे पाहून पंचांना पुढाकार घेत हा वाद मिटवावा लागला. एकीकडून कोलकाताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिनेही अश्विन आणि पंतला सावरले होते.
https://twitter.com/rishobpuant/status/1442820324718825483?s=20
या घटनेनंतर अश्विन कोलकाताचा कर्णधार मॉर्गनवर नाराज असल्याचे दिसून आले होते. तो इनिंग ब्रेकमध्ये संघ प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्यासोबत मिळून सामना पंचांशी याप्रकरणी चर्चा करताना दिसला होता. आपली ही नाराजी त्याने मॉर्गनची विकेट घेत काढली. कोलकाताकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मॉर्गनला अश्विनने भोपळाही फोडू न देता पव्हेलियनचा रस्ता दाखवला. ११.२ षटकात ललित यादवच्या हातून त्याने मॉर्गनला झेलबाद केले.
इतक्यावरच अश्विन थांबला नाही. तर त्याने कोलकाताच्या कर्णधाराला शून्यावर बाद करत आपला सूड पूर्ण केल्याचा आनंदही साजरा केला. विकेट घेतल्यानंतर तो वेगाने मॉर्गनच्या दिशेने धावत जात जोरजोराने काहीतरी बोलत जल्लोष करताना दिसला. त्याने मॉर्गनला दिलेले हे प्रत्युत्तर त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसते आहे.
https://twitter.com/rishobpuant/status/1442837799971921923?s=20
दरम्यान अश्विनने या सामन्यात मॉर्गनची एकमेव विकेट घेतली आहे. त्याने या सामन्यात ४ षटके गोलंदाजी करताना २४ धावा देत एका विकेटची कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पोलार्डचा ‘अष्टपैलू’ पराक्रम! गेल आणि केएल राहुलला एकाच षटकात बाद करत विश्वविक्रमाला घातली गवसणी
मुंबईकरांची मनंच मोठी! चेंडू पायाला लागल्याने राहुल झाला असता धावबाद, पण कृणालने स्वत: पंचांना अडवलं