दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मंगळवारी (२८ सप्टेंबर) आयपीएल २०२१ चा ४१ वा सामना झाला. शारजाहच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात कोलकाता संघाने दिल्लीवर ३ विकेट्सने सोपा विजय मिळवला. या सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी संघातील आर अश्विन आणि टीम साऊथी यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यामध्ये कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉर्गन यानेही उडी घेत अश्विनला ऐकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतही त्याच्याशी भिडला होता. मात्र यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने पुढाकार घेत हा वाद मिटवला होता. आता त्याने हा वाद पेटण्यामागचे कारणही सांगितले आहे.
या विवादाविषयी कोलकाताचा यष्टीरक्षक फलंदज कार्तिक म्हणाला की, “मला इतके माहिती आहे की, अश्विन बाद होण्यापूर्वी राहुल त्रिपाठीने चेंडू टाकला आणि तो रिषभ पंतच्या शरीराला लागून दूर निघून गेला. यावर अश्विनने धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानुसार तो पळालासुद्धा. पण कदाचित इयॉन मॉर्गनला त्याची ही गोष्ट खटकली. मला वाटते की, जेव्हाही चेंडू फलंदाज किंवा त्याच्या बॅटला धडकतो, तेव्हा खेळ भावनेनुसार फलंदाजाने धाव घेऊ नये. याविषयी ज्याचे त्याचे वेगवेगळे मत असू शकते. पण मी या वादात शांतीदूताची भूमिका बजावली आणि माझ्यामुळे वाद मिटला, याचा मला आनंद आहे.”
दिल्लीचा कर्णधार रिषभला या घटनेबद्दल विचारले गेले. यावर तो म्हणाला की, “माझ्या मते हा खेळाचा एक भाग आहे. कारण दोन्ही संघ सामना जिंकण्यासाठी प्रयत्नशील होते आणि अशावेळी अशा घटना घडत असतात. जे काही खेळाच्या दृष्टीने चांगले असते, ते एकप्रकारे खेळ भावनेचाच भाग असते, असे मला वाटते.”
काय होता नेमका वाद?
झाले होते असे की, दिल्ली संघाची फलंदाजी सुरू असताना अंतिम षटकात कर्णधार रिषभ पंत आणि अष्टपैलू आर अश्विन फलंदाजी करत होते. डावातील २० वे षटक टाकण्यासाठी आलेल्या कोलकाताच्या वेगवान गोलंदाज टीम साऊथीच्या पहिल्याच चेंडूवर अश्विनला नितिश राणाच्या हातून केवळ ९ धावांवर झेलबाद केले होते. अश्विनची विकेट गेल्यानंतर साऊथी त्याला हाताने इशारा करत काहीतरी बोलताना दिसला. हे पाहून अश्विननेही त्याला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आणि त्यांच्यातील वाद वाढत गेला होता.
https://twitter.com/rishobpuant/status/1442820324718825483?s=20
पुढे कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉर्गननेही यामध्ये हस्तक्षेप केला. त्यानंतर दिल्लीचा कर्णधार पंतनेही त्याच्यावर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. हे पाहून पंचांना पुढाकार घेत हा वाद मिटवावा लागला. एकीकडून कोलकाताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिनेही अश्विन आणि पंतला सावरले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
विकेट गेल्याच्या संतापात अश्विनची गोलंदाज साऊथीशी बाचाबाची, मग पंत-मॉर्गनमध्येही जुंपली, अखेर…
सेहवागला पछाडत पंतच्या दिल्लीसाठी सर्वाधिक धावा; तर इतर संघांसाठी ‘हे’ खेळाडू आहेत ‘रनमशीन’