शारजाह। मंगळवारी (२८ सप्टेंबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ मध्ये ४१ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्स संघाचा ३ विकेट्सने पराभव केला. पण असे असले तरी, दिल्लीचा विद्यमान कर्णधार रिषभ पंतच्या नावावर मोठा विक्रम झाला आहे.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीकडून पंतने ३६ चेंडूत ३ चौकारांसह ३९ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. त्याने आत्तापर्यंत दिल्लीसाठी ७९ सामने खेळले असून ३५.६७ च्या सरासरीने २३९० धावा केल्या आहेत. यात त्याच्या १ शतकाचा आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे.
त्याने दिल्लीसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विरेंद्र सेहवागला मागे टाकत अव्वल क्रमांक मिळवला आहे. सेहवागने दिल्लीसाठी ८६ टी२० सामने खेळले असून २९.७७ च्या सरासरीने १ शतक आणि १७ अर्धशतकांसह २३८२ धावा केल्या आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर आहे. त्याने २२९१ धावा केल्या आहेत.
दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (२८ सप्टेंबर २०२१ पर्यंत) –
२३९० – रिषभ पंत (७९ सामने)
२३८२ – विरेंद्र सेहवाग (८६ सामने)
२२९१ – श्रेयस अय्यर (८२ सामने)
१९३३ – शिखर धवन (५८ सामने)
१४५६ – डेव्हिड वॉर्नर (५७ सामने)
प्रत्येक संघासाठी सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
पंतने दिल्लीसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याचप्रमाणे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी विराट कोहलीने (६६०९), चेन्नई सुपर किंग्ससाठी सुरेश रैनाने (५५२४), कोलकाता नाईट रायडर्ससाठी गौतम गंभीरने (३३४५), सनरायझर्स हैदराबादसाठी डेव्हिड वॉर्नरने (४०१४), मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्माने (४३९४), पंजाब किंग्ससाठी शॉन मार्शने (२४७७) आणि राजस्थान रॉयल्ससाठी अजिंक्य रहाणेने (३०९८) सर्वाधिक धावा केल्या आहेत.
कोलकाताचा विजय
मंगळवारी झालेल्या सामन्यात कोलकाताच्या गोलंदाजांनी दिल्लीला २० षटकांत ९ बाद १२७ धावांवर रोखले होते. त्यामुळे कोलकाता समोर विजयासाठी १२८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग कोलकाताने १८.२ षटकांत ७ विकेट्स गमावत सहज पूर्ण केला.
महत्त्वाच्या बातम्या –
पोलार्डचा ‘अष्टपैलू’ पराक्रम! गेल आणि केएल राहुलला एकाच षटकात बाद करत विश्वविक्रमाला घातली गवसणी