‘छंद’… वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टींचा छंद असतो. त्यातही गाणे गायला आणि डान्स करायला सर्वांनाच आवडते. मराठी, हिंदी खासकरुन दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील गाणे तर प्रत्येकाला थिरकायला भाग पाडतात. आयपीएलच्या सनरायझर्स हैदराबाद आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेविड वॉर्नर याचे दाक्षिणात्य सिनेसृष्टीबद्दलचे प्रेम आपल्यापासून लपून राहिलेले नाही. या रांगेत आता भारतीय क्रिकेटपटूंचीही नावे जोडली गेली आहेत. आर अश्विन, हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांचा एका प्रसिद्ध तमिळ गाण्यावर नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
तमिळ सुपरस्टार विजय थलपती याच्या प्रसिद्ध ‘वाथी कमिंग’ गाण्यावर या भारतीय क्रिकेटपटूंनी ठेका धरला आहे. भारताचा अनुभवी फिरकीपटू अश्विनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अश्विनसह अष्टपैलू पंड्या आणि फिरकीपटू कुलदीप अभिनेता विजयच्या ‘वाथी कमिंग’ स्टेपची नक्कल करताना दिसत आहेत.
सर्वप्रथम अश्विन ती स्टेप करायला सुरू करतो. त्यानंतर त्याच्याजवळ उभा राहिलेल्या पंड्याला तो ती स्टेप करायला सांगतो. शेवटी कुलदीप त्या दोघांच्या मागून एन्ट्री मारतो आणि नाचू लागतो. अश्विनने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘वाथी आमचा डान्स पाहून नक्कीच खुष झाला असेल!!’
त्यांच्या या मजेशीर डान्सच्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली असून सोशल मीडियावर या व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे.
https://www.instagram.com/p/CLeiAkrn2Jo/?utm_source=ig_web_button_share_sheet
सध्या भारतीय संघाचे सर्व खेळाडू अहमदाबादमध्ये सराव करण्यात व्यस्त आहेत. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या २ सामन्यातील प्रत्येकी १ सामना जिंकत भारत आणि इंग्लंड संघ मालिकेत बरोबरीवर आहेत. त्यानंतर २४ फेब्रुवारीपासून या दोन्ही संघात पुढील तिसरा कसोटी सामना रंगणार आहे.
या सामन्यात दमदार फॉर्ममध्ये असलेला भारतीय संघ आपली विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न करेल. सोबतच हा सामना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने इंग्लंडही विजयासाठी झगडताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या-
खुशखबर! आयपीएल २०२१चे साखळी फेरी सामने होणार महाराष्ट्राच्या राजधानीत, तर प्लेऑफ ‘या’ शहरात?
नक्की १५ कोटी म्हणजे किती रे भावा? आरसीबीने खरेदी केलेल्या जेमिसनला लिलावानंतर पडला प्रश्न






