दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2025 मध्ये खेळणार की नाही, यावर विविध चर्चा सुरु आहेत. धोनीनं याबाबत अद्याप काहीही स्पष्ट सांगितलेलं नाही. आता बोललं जात आहे की, धोनी आयपीएलमध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळू शकतो. यावर फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं आपलं मत मांडलं आहे. अनकॅप्ड खेळाडू तो असतो, ज्यानं अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. भारताचा माजी कर्णधार धोनीनं 2019 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
वास्तविक, आयपीएलमध्ये 2008 पासून 2021 पर्यंत एक नियम लागू होता. या नियमानुसार, ज्या खेळाडूला निवृत्त होऊन 5 वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे, त्याला अनकॅप्ड खेळाडू मानलं जायचं. एका रिपोर्टनुसार, चेन्नई सुपर किंग्जनं आयपीएल संघांच्या बैठकीत हा नियम पुन्हा लागू करण्याची मागणी केली आहे. सीएसकेला 5 आयपीएल ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या धोनीनं आयपीएल 2024 पूर्वी संघाचं कर्णधारपद सोडलं होतं.
या संदर्भात अश्विननं आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हटलं, “धोनी अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळेल का? हा मोठा प्रश्न आहे. मात्र हा मुद्दा रास्त आहे. धोनीनं बऱ्याच वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेलं नाही. त्यानं निवृत्ती घेतलेली आहे. म्हणून तो कॅप्ड नव्हे, अनकॅप्ड खेळाडू आहे. धोनी अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळू शकतो का? हा वेगळा मुद्दा आहे. निश्चितच जर कोणी धोनीबद्दल बोलत असेल तर, तो याबाबतही भाष्य करेल.”
यावेळी अश्विननं विदेशी खेळाडूंवर ताशेरे ओढले. अश्विन म्हणाला, “विदेशी खेळाडू मेगा ऑक्शन ऐवजी मिनी ऑक्शनला जास्त किंमत देतात, कारण यामध्ये त्यांना जास्त पैसा मिळतो.” विशेष म्हणजे, आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. त्यापूर्वी जास्तीत जास्त किती खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी देण्यात यावी, यावर मंथन चालू आहे.
हेही वाचा –
निवृत्तीनंतरही गोलकीपर श्रीजेश भारतीय संघासोबतच राहणार, हॉकी इंडियानं सोपवली मोठी जबाबदारी
ढोल-ताशा आणि डान्स, भारतीय हॉकी संघाचं मायदेशात अश्या पध्दतीनं स्वागत! पाहा VIDEO
पदकाच्या अगदी जवळ येऊन दूर राहिले! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानी राहणारे भारतीय खेळाडू