भारताचा आघाडीचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन त्याच्या गोलंदाजी शिवाय फलंदाजीसाठी देखील ओळखला जातो. त्यानं टीम इंडियासाठी अनेक प्रसंगी उत्कृष्ट खेळी खेळल्या आहेत. आता तो तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये आपली प्रतिभा दाखवत आहे.
तामिळनाडू प्रीमियर लीगच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात रविचंद्रन अश्विननं बॅटनं जोरदार कामगिरी केली. त्यानं आयड्रीम तिरुप्पूरविरुद्ध शानदार फलंदाजी करत आपल्या संघाला विजयापर्यंत नेलं. अश्विनच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर डिंडीगुल ड्रॅगन्सनं फायनलमध्ये धडक मारली आहे.
तामिळनाडू प्रीमियर लीगचा दुसरा क्वालिफायर सामना आयड्रीम तिरुप्पूर आणि डिंडीगुल ड्रॅगन्स यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना तिरुप्पूर संघ 19.4 षटकांत केवळ 108 धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात, दिंडीगुल ड्रॅगन्सनं कर्णधार रविचंद्रन अश्विनच्या स्फोटक खेळीच्या जोरावर अवघ्या 10.5 षटकांत 1 गडी गमावून लक्ष्य गाठलं.
या सामन्यात रविचंद्रन अश्विननं 30 चेंडूत 69 धावांची खेळी केली. आपल्या या खेळीत त्यानं 11 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याच्या फलंदाजीनं सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. अश्विनशिवाय विमल कुमारनं 27 चेंडूत 28 धावा केल्या. आता अश्विनचा संघ चॅम्पियन बनण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना आयड्रीम तिरुप्पूरचा टॉप ऑर्डर पूर्णपणे फ्लॉप ठरला. अमित सात्विकनं सर्वाधिक 16 धावा केल्या. मात्र बाकीचे फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाही. तुषार रहेजा 8, अनिरुद्ध बालचंद्र 6, एस राधाकृष्णन 2 आणि कर्णधार साई किशोर केवळ 2 धावा करू शकले. खालच्या क्रमवारीत मान बाफनानं 19 चेंडूत 26 धावा करत संघाची धावसंख्या 100 च्या पुढे नेली.
डिंडीगुल ड्रॅगन्ससाठी पी विघ्नेशनं 4 षटकात फक्त 8 धावा देत 3 बळी घेतले. त्याच्याशिवाय कर्णधार अश्विननंही जबरदस्त गोलंदाजी केली. त्यानं 4 षटकात 27 धावा देत 1 बळी घेतला. वरुण चक्रवर्तीनं दोन बळी घेतले.
हेही वाचा –
पृथ्वी शॉ बॅटनं आग ओकतोय, पुन्हा ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा; गौतम गंभीरच्या संघात संधी मिळेल का?
क्रिकेटचा थरार होणार डबल! भारतातील या शहरात बांधण्यात येणार आणखी एक आंतरराष्ट्रीय स्टेडियम
भारतानं दोनच वनडे विश्वचषक जिंकले, मग जर्सीवर तीन स्टार्स कसे?