आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आयसीसीने रविवारी (२० डिसेंबर) कसोटी खेळाडूंची नवी क्रमवारी जाहीर केली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या बॉर्डर- गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटीनंतर खेळाडूंच्या क्रमवारीत काही बदल झाले आहेत. भारतासाठी फक्त प्रमुख फिरकीपटू आर आश्विन यालाच ह्या नव्या क्रमवारीत फायदा झाला. प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मात्र या क्रमवारीत नुकसान झाले, तर पॅट कमिन्सने आपले अव्वल स्थान अबाधित राखले आहे.
अश्विनला झाला नव्या क्रमवारीत फायदा
रविवारी (२० डिसेंबर) रात्री उशिरा कसोटी खेळाडूंची वैयक्तिक क्रमवारी आयसीसीने जाहीर केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍडलेड येथील दिवस-रात्र कसोटीत भारताकडून गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अश्विनला या क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला. अश्विनने पहिल्या डावात ४ व दुसऱ्या डावात १ बळी मिळवला होता. आधी दहाव्या स्थानी असलेला अश्विन आता नवव्या स्थानी आला. पहिल्या कसोटीत दोन बळी मिळवणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला या क्रमवारीत नुकसान झाले. बुमराह नवव्या स्थानावरून आता दहाव्या स्थानी घसरला आहे. बुमराह आणि वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर संयुक्तपणे दहाव्या स्थानी आहेत.
हेजलवूडने घेतली मोठी झेप
ऍडलेड कसोटीत भारताचा पराभव करण्यात सिंहाचा वाटा उचलणारा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडला या नव्या क्रमवारीत मोठा फायदा झाला. पहिल्या कसोटीपूर्वी आठव्या स्थानी असलेल्या हेजलवूडने या नव्या क्रमवारीत पाचवे स्थान पटकावले. हेजलवूडने ऍडलेड कसोटीच्या दुसऱ्या डावात अवघ्या ८ धावा देऊन भारताचे ५ फलंदाज तंबूत धाडले होते. हेजलवूड २०१८ नंतर प्रथमच पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये सामील झाला आहे.
हे गोलंदाज आहेत कसोटी क्रमवारीत टॉप टेनमध्ये
गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार आणि प्रमुख वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा अव्वल स्थानी कायम आहे. त्याच्यापाठोपाठ इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडचा क्रमांक लागतो. तिसर्या आणि चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाज नील वॅग्नर आणि टीम साऊदी आहेत. सहाव्या, सातव्या आणि आठव्या स्थानी अनुक्रमे कागिसो रबाडा, मिचेल स्टार्क व जेम्स अँडरसन यांचा क्रमांक लागतो.
महत्त्वाच्या बातम्या-
अफगाणिस्तान क्रिकेटसाठी खुशखबर; ‘या’ ठिकाणी बनणार नवे स्टेडियम
भारताला कोहली आणि पुजाराचे अपयश भोवले, ऑस्ट्रेलियाच्या माजी फलंदाजचे मत
“विहारीला वरच्या फळीत संधी मिळावी, तर राहुलला…,” माजी भारतीय क्रिकेटरने मांडले मत






