आयसीसी महिला विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामना रविवारी (३ एप्रिल) ख्राइस्टचर्चच्या हेगली ओवल मैदानावर खेळला गेला. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघ अंतिम सामन्यात आमने सामने होते. ऑस्ट्रेलियाने हा महत्वाचा सामना ७१ धावांनी जिंकला आणि विश्वचषक नावावर केला. या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाची उपकर्णधार रचेल हेन्सने या सामन्यात केलेल्या खेळीनंतर स्वतःच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद केली.
ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार रचेल हेन्स (Rachael Haynes) आता एका महिला विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारी फलंदाज बनली आहे. हेन्सने या अंतिम सामन्यात ९३ चेंडू खेळले आणि ६८ धावा केल्या. यामध्ये तिने ७ चौकार मारले.
एका महिला विश्वचषकात (ICC Women’s World Cup 2022) सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम यापूर्वी न्यूझीलंडच्या डेबी हॉकली (Debbie Hockley) यांच्या नावावर होता, जो हेन्सने मोडीत काढला आहे. आयसीसी महिला विश्वचषक २०२२ च्या या अंतिम सामन्यात हॉकली सामलोचनाचे काम करत आहेत आणि त्यांच्या डोळ्यांसमोरच हेन्सने हा विक्रम मोडून स्वतःचे नाव इतिहासात कोरले आहे. हेन्सने या विश्वचषक स्पर्धेत ४६३ धावा केल्या आहेत आणि ती या यादीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाली आहे.
हॉकली यांनी १९९७ साली खेळल्या गेलल्या महिला विश्वचषकात सर्वाधिक ४५६ धावा केल्या होत्या आणि एका महिला विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पहिला क्रमांक मिळवला होता. ऑस्ट्रेलियाच्या लिंडसे रीलर यांनी १९८८ महिला विश्वचषकात ४४८ धावा केल्या होत्या आणि त्या या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. चौथ्या क्रमांकावर पुन्हा एकदा डेबी हॉकलींचे नाव आहे, त्यांनी १९८८ विश्वचषकात ४४६ धावा केल्या होत्या. यादीत सर्वात शेवटी पाचव्या क्रमांकावर बेलिंडा क्लार्क आहेत, ज्यांनी १९९७ महिला विश्वचषकात ४४५ धावा साकारल्या होत्या.
दरम्यान, विश्वचषकाच्या या अंतिम सामन्याचा विचार केला, तर ऑस्ट्रेलियाने मोठ्या फरकाने विजेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर एलिसा हिली (Alyssa Healy) ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक १७० धावांची दमदार खेळी केली. यासाठी तिला १३८ चेंडूंचा सामना करावा लागला. हिलीच्या खेळीत तब्बल २६ चौकारांचा समावेश होता. सलामीवीर हेन्सकडून तिला चांगली साथ मिळाली आणि या दोघींनी पहिल्या विकेटसाठी १६० धावांची भागीदारी केली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या बेथ मूनीने ६२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने ५० षटकांमध्ये ५ विकेट्सच्या नुकसानावर ३५६ धावा केल्या.
प्रत्युत्तरात इंग्लंडचा संपूर्ण संघ २८५ धावांवर आणि ४३.४ षटकांमध्ये गुंडाळला गेला. इंग्लंडसाठी नॅट सायव्हर (Nat Sciver) हिने नाबाद १४८ धावा केल्या. त्याव्यतिरिक्त इंग्लंडसाठी त्यांची एकही फलंदाज अर्धशतकी खेळी करू शकली नाही.
महत्वाच्या बातम्या –
IPL 2022| केव्हा, कुठे आणि कसा पाहाल चेन्नई वि. पंजाब सामना, जाणून घ्या सर्वकाही