विश्वचषक 2023च्या पहिल्याच सामन्यात युवा रचिन रविंद्र याने न्यूझीलंडसाठी शतकी खेळी केली. रचिनसह सलामीवीर डेवॉन कॉनवे यानेही न्यूझीलंडच्या विजयात शतकी खेळीचे योगादन दिले. गतविजेत्या इंग्लंडला या सामन्यात 9 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. सामना संपल्यानंतर रचिनने सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या नावाच उल्लेख करत खास प्रतिक्रिया दिली.
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर इंग्लंडने नाणेफेक गमावली होती आणि त्यांना न्यूझीलंडकडून प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाले. निर्धारीत 50 षटकांमध्ये इंग्लंडने 9 विकेट्सच्या नुकसानावर 282 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 36.2 षटकांमध्ये 283 धावांचे लक्ष्य गाठले. विश्वचषक 2023 मधील हा पहिलाच सामना असून रचिन रविंद्र () आणि डेवॉन कॉनवे () यांनी वैयक्तिक शतके करत न्यूझीलंडसाठी द्विशतकी भागीदारी केली. रचिनने 96 चेंडूत 123* धावा केल्या, तर कॉनवने 121 चेंडूत 152* धावा कुटल्या.
सामनावीर पुरस्कार जिंकलेल्या रचिनने विजयानंतर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या नावावर त्याचे नाव ठेवले गेल्याचा खुलासा केला. न्यूझीलंडला विजय मिळवून दिल्यानंतर रचिन म्हणाला, “माझे नाव सचिन आणि द्रविडच्या नावावरून ठेवले, यासाठी मी स्वतःला नशीबवान मानतो.” रचिन रविंद्रचे कुटुंब तसे मुळचे भारतीय आहे. माहितीनुसार 1990च्या आसपास त्याचे कुटुंब बेंगलोरमधून न्यूझीलंडला रवाना झाले. रचिनच्या वडिलांना क्रिकेटची आवड असून सचिन आणि द्रविड हे त्यांचे आवडते खेळाडू आहेत. याच कारणास्तव त्यांनी आपल्या मुलाच्या जन्मानंतर त्याचे नाव सचिन मधील ‘चिन’ आणि राहुल द्रविड मधील ‘र’ घेऊन ‘रचिन’ असे ठेवले. (Rachin Ravindra said “I am lucky to be named after two legends with Dravid & Sachin”.)
इंग्लंड प्लेईंग इलेव्हन- जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान, जो रूट, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वूड, हॅरी ब्रूक.
न्यूझीलंड प्लेईंग इलेव्हन- डेवॉन कॉनवे, विल यंग, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, टॉम लॅथम( कर्णधार), ग्लेन फिलिप्स, ट्रेंट बोल्ट, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, रचिन रवींद्र, मॅट हेन्री
महत्वाच्या बातम्या –
कॉनवेच्या दीडशतकाने वाढले भारतीयांचे टेन्शन! नरेंद्र मोदी स्टेडियमवर घडला नकोसा योगायोग
रचिनने रचला इतिहास! वर्ल्डकप पदार्पणातच झळकावले दणदणीत शतक, न्यूझीलंड विजयाच्या दिशेने