-आदित्य गुंड (ट्विटर- @AdityaGund)
पाच वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये राफा आणि जोकर यांच्यातला सामना ५ तास ५३ मिनिटे चालला होता. यंदा पुन्हा तशी वेळ आलीच तर शरीराने साथ दिली नाही असे व्हायला नको याची या दोघांनी यावर्षी पुरेपूर काळजी घेतली. अंतिम फेरीच्या आधीचे सामने कमीत कमी वेळात कसे जिंकता येतील याकडे दोघांनी लक्ष दिले. अंतिम फेरीत प्रवेश करताना राफाने एकूण १२ तास १० मिनिटे तर जोकरने ११ तास ५९ मिनिटे एवढा वेळ कोर्टवर घालवला. सेमी फायनलनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जोकरला एका पत्रकाराने प्रश्न विचारला,
“सेमी फायनलचा सामना राफापेक्षा कमी गेम हारून जिंकायचा हे तू ठरवून आला होतास का?”
या प्रश्नाला जोकरचे उत्तर “हो” असे होते. राफाविरुद्ध खेळताना शारीरिक क्षमता किती महत्वाची असते हे जोकोविचशिवाय अजून कोणाला माहित असणार म्हणा? राफा त्याच्या सेमी फायनलमध्ये ६ गेम हरला तर जोकरने फक्त चार गेम हरत आपली सेमी फायनल जिंकली. दोघेही एकमेकांविरुद्ध भरपूर टेनिस खेळले आहेत. दोघांनाही एकमेकांचा गेम अगदी जवळून माहित आहे. या अंतिम फेरीच्या सामन्याअगोदर राफा आणि जोकरने एकमेकांच्या विरोधात ५२ सामने खेळले. यात जोकर २७ विजयांसह आघाडीवर होता. नदालने जोकरविरुद्ध ग्रँडस्लॅममध्ये हार्डकोर्टवर शेवटचा विजय २०१३ च्या यूएस ओपनमध्ये मिळवला होता. त्या सामन्यानंतर हे दोघे एकमेकांच्या विरोधात सात सामने हार्डकोर्टवर खेळले. यात जोकरने १४ सेट जिंकले तर राफाला एकही सेट जिंकता आलेला नव्हता.
याआधी राफा लॉंग रॅलीज खेळण्यासाठी प्रसिद्ध होता. प्रतिस्पर्ध्याने मारलेला बॉल परतवत राहून प्रतिस्पर्ध्याला दमवून हरवणे शिकावे तर राफाकडून. यावर्षी मात्र राफाने कमीत कमी शॉट्समध्ये पॉईंट्स कसे जिंकता येतील यावर लक्ष दिले. २०१७ आणि २०१९ च्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील नदालच्या कामगिरीची तुलना केली तर खालील आकडेवारी मिळते.
२०१७ च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये राफाच्या ६२% रॅलीज ०-४ शॉट्सच्या होत्या. यावर्षी हे प्रमाण ६२% वरून ७१% वर गेलं. २०१७ मध्ये राफाच्या २३% रॅलीज ५-८ शॉट्सच्या होत्या. हे प्रमाण यंदा १९% वर आलं. २०१७ मध्ये ९ किंवा त्याहून अधिक शॉट्सच्या रॅलीजची टक्केवारी १४% होती आणि या वर्षी हेच प्रमाण १०% वर आलं. थोडक्यात राफाने कमीत कमी शॉट्सच्या रॅलीज खेळून पॉईंट्स जिंकण्यावर लक्ष दिलं आणि लॉंग रॅलीजची संख्या कमी केली. या आकडवारीवरून हे लक्षात येतंय की राफाने आपल्या क्ले कोर्टची शैली नुसती बदललीच नाही तर हार्डकोर्टची जास्त आक्रमक अशी शैली आपलीशी करून घेतली आहे. लॉंग रॅलीजची टक्केवारी १४ वरून १० पर्यंत आली आहे. तीन चार शॉट्समध्ये रॅली जिंकता येतेय तर मग १३-१४ शॉट्स खेळायचेच कशाला? अशा काहीश्या डावपेचाने तो ऑस्ट्रेलियन ओपनचे सामने खेळला.
राफाने आपली शैली काहीशी बदलली तरी जोकरही मागे नव्हता. जोकर टेनिसमधला सर्व्हिस रिटर्न करणारा एक सर्वोत्तम खेळाडू मानला जातो. जोकोविच यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ५८० पॉईंट्स प्रतिस्पर्धी खेळाडूच्या सर्व्हिसवर खेळला (अंतिम सामन्याआधी). यातले २४९ पॉईंट्स त्याने जिंकले. टक्केवारीत बोलायचं झालं तर जोकोविचने ४३% पॉईंट्स प्रतिस्पर्धी खेळाडूच्या सर्व्हिसवर जिंकले आहेत. गेल्यावर्षीच्या विंबल्डनमध्ये हीच टक्केवारी ३६% तर यूएस ओपनमध्ये ३९% होती. प्रतिस्पर्धी खेळाडूची सर्व्हिस परतवून लावण्याच्या शैलीमध्ये जोकरने केलेला बदल त्याला निश्चितच लाभदायक ठरलाय. या तीनही लागोपाठ होणाऱ्या स्पर्धा त्याने जिंकल्यात.
राफा आणि जोकर दोघांनीही आपापल्या शैलीमध्ये छोटे बदल करून आपापले सामने जिंकले तरी समोरासमोर आल्यावर जोकर राफाला भारी पडला.नुसता भारी नाही तर त्याने राफाचा अक्षरशः कचरा केला. राफाला ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत सरळ सेटमध्ये हरवणारा जोकर हा पहिला खेळाडू ठरलाय. ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये राफाला तीन किंवा त्याहून अधिक वेळा हरवलेले केवळ दोन खेळाडू आहेत.एक फेडरर आणि दुसरा जोकर.फेडररने राफाला तीन वेळा हरवलंय तर जोकरने राफाला तब्बल सहा वेळा हरवलंय.
ऑस्ट्रेलियन ओपन सातव्यांदा जिंकून ही स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकण्याचा विक्रम जोकरने आपल्या नावावर केलाय.हे करत असताना सर्वाधिक ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याने सॅम्प्रासला मागे टाकत तिसरे स्थानही मिळवले. आता फेडरर (२०), राफा (१७) आणि जोकर (१५) असे तिघेही नव्या पिढीचे शिलेदार पहिल्या तीन क्रमांकावर आहेत.
जोकोविच, फेडरर आणि राफा यांची गेल्या दोन वर्षांतली कामगिरी हेच सांगतेय की, “आम्ही अजूनही संपलेलो नाही.तुम्हाला अजून थोडी वाट पहावी लागेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
–नोव्हाक जोकोविचने सातव्यांदा जिंकले ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद
–सायना नेहवालला इंडोनेशिया मास्टर्सचे विजेतेपद
–संपूर्ण यादी: गौतम गंभीर, सुनील छेत्रीसह या भारतीय खेळाडूंची २०१९ पद्म पुरस्कारांसाठी झाली निवड