टेनिस जगतात वेगळी ओळख निर्माण करणारा स्पेनचा राफेल नदाल हा या वर्षी त्याच्या सर्वोत्तम लयीत होता असे मत अनेक दिग्गजांनी व्यक्त केले. त्याने स्वतः देखील हे मान्य केले की गेल्या अनेक वर्षांपेक्षा हे वर्ष काही विशेष होतं. या वर्षी फ्रेंच ओपनचे जेतेपद हे त्याचे १०वे असून एकूण १५ ग्रँड स्लॅम विजेतेपद त्याच्या नावे आहेत.
एटीपी क्रमवारीत राफेल नदालने तीन वर्षात प्रथमच अव्वल स्थानी झेप घेतली आहे. यापूर्वी नदाल ६ जुलै २०१४ च्या आठवड्यात पहिल्या क्रमांकावर होता. नदालने आजवर आपल्या कारकिर्दीत प्रथम क्रमांकावर एकूण १४१ आठवडे राज्य केले आहे.
सध्या सुरु असलेल्या सिनसिनाटी ओपनमधून रॉजर फेडररने माघार घेतल्यामुळे नदालला हा मान मिळवता आला. यापूर्वी पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या अँडी मरेने दुखापतीमुळे सिनसिनाटी ओपनमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याची जागा राफेल नदालला देण्यात आली.
नदाल म्हणतो “गेल्या अनेक वर्षात एवढ्या गोष्टी घडून गेल्यावर मी परत प्रथम क्रमांकावर विराजमान होईन असे मला वाटले नव्हते पण हे अविश्वसनीय आहे.”