अफगाणिस्तानचा सलामी फलंदाज रहमानउल्ला गुरबाजनं अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत चमकदार कामगिरी केली. शारजाह मैदानावर झालेल्या दुसऱ्या सामन्यात त्यानं 105 धावा आणि तिसऱ्या सामन्यात 89 धावा केल्या. पहिल्या वनडेत तो शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. अफगाणिस्ताननं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली, ही मोठी कामगिरी आहे. आता गुरबाजला त्याच्या या कामगिरीचं फळ मिळालं आहे.
वास्तविक, आयसीसीनं बुधवारी खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली. गुरबाजनं वनडे फलंदाजांच्या यादीत 10 स्थानांची झेप घेतली आहे. यासह त्यानं अनोखा इतिहास रचला. आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत टॉप-10 मध्ये पोहोचणारा तो पहिला अफगाण खेळाडू ठरला आहे. तो सध्या आठव्या स्थानावर आहे. गुरबाजच्या खात्यात 692 रेटिंग गुण आहेत. आगामी काळात तो आपली लय कायम ठेवण्यात यशस्वी ठरला, तर तो टॉप 5 मध्ये देखील पोहोचू शकतो.
गुरबाजच्या आधी अफगाणिस्तानसाठी सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाजी रँकिंगचा विक्रम इब्राहिम झद्रानच्या नावावर होता. झद्राननं 12वं स्थान मिळवलं होतं. गुरबाजशिवाय ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडनंही टॉप-10 मध्ये प्रवेश केला आहे. तो 684 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. हेड सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतील तीन सामन्यांमध्ये त्यानं 214 धावा ठोकल्या, ज्यामध्ये 154 धावांच्या नाबाद खेळीचा समावेश आहे.
अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खाननं देखील वनडे गोलंदाजांच्या क्रमवारीत मुसंडी मारली. त्यानं आठ स्थानांची झेप घेत तिसरं स्थान पटकावलं. त्याचे 665 रेटिंग गुण आहेत. राशिदनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सात विकेट घेतल्या होत्या. भारताचा कुलदीप यादव (665) या क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज (695) अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा ॲडम झाम्पा (681) दुसऱ्या स्थानावर आहे.
हेही वाचा –
बीसीसीआयचा अचानक मोठा निर्णय, हे 3 खेळाडू दुसरी कसोटी खेळणार नाहीत
ICC Test Rankings; यशस्वी जयस्वालचा टॉप-5 मध्ये प्रवेश, विराट-रोहितचे भारी नुकसान
कानपूर कसोटीत पुन्हा दिसेल अश्विनचा दरारा, वॉर्न-झहीर सारख्या दिग्गजांचे रेकॉर्ड धोक्यात!