येत्या १९ सप्टेंबर पासून युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर १७ ऑक्टोबर पासून युएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. बुधवारी (८ सप्टेंबर) बीसीसीआयने टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे.
या संघात मुंबई इंडियन्स संघातील ६ खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, या संघात राहुल चाहरला देखील संधी देण्यात आली आहे. संघात आपली निवड झाली आहे, ही बातमी मिळताच राहुल चाहर आश्चर्यचकित झाला होता. मुंबई इंडियन्स संघाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आपली प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे.
विश्वचषक स्पर्धा खेळणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. २ वर्ष मेहनत केल्यानंतर राहुल चाहरचे हे स्वप्न आता सत्यात उतरले आहे. राहुलची ३ वर्षांपूर्वी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी राखीव खेळाडू म्हणून निवड झाली होती. परंतु, त्याला या विश्वचषक स्पर्धेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर राहुल चाहरने १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
काय म्हणाला चाहर?
मुंबई इंडियन्स संघाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये राहुल चाहर म्हणाला की, “मी इथपर्यंत पोहचण्यासाठी खूप मेहनत केली आहे. मला १९ वर्षाखालील टी -२० विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नव्हती. इतकी मोठी स्पर्धा खेळण्याची संधी आयुष्यात खूप कमी वेळेस मिळते. त्यामुळे मला आनंद तर आहेच, परंतु मी भावुक देखील झालो आहे.” या व्हिडिओमध्ये मुंबई इंडियन्स संघातील इतर खेळाडू देखील राहुल चाहरला शुभेच्छा देताना दिसून येत आहेत.(Rahul chahar confirmed his selection in team india over phone watch it’s video)
https://twitter.com/mipaltan/status/1435653105471791105?s=19
१९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत राखीव खेळाडू म्हणून निवड
राहूल चाहरची २०१८ मध्ये झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत राखीव खेळाडू म्हणून निवड झाली होती. या स्पर्धेपूर्वी १९ वर्षाखालील संघाने इंग्लंडचा दौरा केला होता. या दौऱ्यावर चाहरने अप्रतिम कामगिरी केली होती. परंतु, त्याला १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत अंतिम १५ खेळाडूंमध्ये स्थान मिळवता आले नव्हते.
त्यानंतर त्याला मुंबई इंडियन्स संघात संधी मिळाली आणि इथूनच त्याच्या कारकिर्दीला वेगळे वळण लागले. राहुलने टी -२० कारकिर्दीत आतापर्यंत एकूण ६६ सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याला ८२ गडी बाद करण्यात यश आले आहे.
राहुलचा चुलत भाऊ दीपक चाहरची टी२० विश्वचषकासाठी राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“संघात निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन, पण मला चहल व शिखरची निवड न झाल्याचे दु:ख”
एमएस धोनीला मेंटर केल्यानंतर सुनील गावसकरांना आनंदाबरोबर सतावतेय ‘या’ गोष्टीची चिंता
टी२० विश्वचषकासाठी ‘या’ ३ खेळाडूंची भारतीय संघात निवड होण्यामागे विराट-शास्त्रींचा हात?