प्रो कबड्डीचा पोस्टर बॉय म्हणून ओळखला जाणारा राहुल चौधरीने प्रो कबड्डीत एक मोठा विक्रम केला आहे. प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामाचा लिलाव 30 आणि 31 मे रोजी मुंबईत पार पडला. यावेळी “फायनल बीड मॅच” वापरुन तेलुगू टायटन्स संघाने राहुल चौधरी संघात कायम केले.
यामुळे तो प्रो कबड्डीमधील आत्तापर्यंतच्या सर्व हंगामात एकाच संघाकडून खेळणारा एकमेव खेळाडू ठरणार आहे. याआधी झालेल्या 5 मोसमात हा विक्रम राहुल चौधरी,जसवीर सिंग आणि अनुप कुमार या तीन खेळाडूंच्या नावावर होता.
परंतू 6 व्या मोसमासाठी अनुप कुमारला जयपूर पिंक पँथर संघाने तर जसवीर सिंगला तमिल थलायवाजने संघात घेतले आहे.
राहुल चौधरीप्रमाणेच आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीही आयपीएलचे सर्व मोसम एकाच संघाकडून खेळला आहे. आयपीएलमध्येही असा विक्रम करणारा विराट एकमेव खेळाडू आहे.
विशेष म्हणजे या दोघांनीही त्यांच्या संघाचे कर्णधारपद संभाळले आहे, परंतू त्यांना त्यांच्या संघासाठी एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही.
24 वर्षीय राहुल चौधरीने प्रो कबड्डीच्या 5 मोसमात सर्वाधिक 710 गुण मिळवले आहेत. 710 गुणांपैकी त्याने 666 गुण रेडमधून तर 44 गुण टॅकलमधून कमावले आहे. तसेच तो प्रो कबड्डीच्या 5 मोसमात सर्वाधिक रेडपॉइंट मिळवणाराही कबड्डीपटू आहे.
त्याने आत्तापर्यंत प्रो कबड्डीत 1369 रेड मारल्या आहेत यातील त्याच्या 543 रेड यशस्वी ठरल्या आहेत. सर्वाधिक वेळा यशस्वी रेड करणाऱ्या रेडर्समध्येही राहुल चौधरी अव्वल क्रमांकावर आहे.
अशी आहे 5 मोसमातील राहुल चौधरीची कामगिरी:
संघ – तेलुगू टायटन्स
2013, मोसम पहिला: सामने – 14, एकूण गुण- 161, रेडपॉइंट- 151, टॅकलपॉइंट- 10
2014, मोसम दुसरा: सामने – 12, एकूण गुण- 107, रेडपॉइंट- 98, टॅकलपॉइंट- 9
2015, मोसम तिसरा: सामने – 13, एकूण गुण- 99, रेडपॉइंट- 87, टॅकलपॉइंट- 12
2016, मोसम चौथा: सामने – 16, एकूण गुण- 150, रेडपॉइंट- 146, टॅकलपॉइंट- 4
2017, मोसम पाचवा: सामने – 22, एकूण गुण- 193, रेडपॉइंट- 184, टॅकलपॉइंट- 9
महत्त्वाच्या बातम्या:
–दुबई मास्टर कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व या खेळाडूकडे
–फुटबॉल विश्वचषक 2018: भारताच्या माजी कर्णधाराचा मेस्सीला पाठींबा