भारतात सध्या प्रसिद्ध देशांतर्गत स्पर्धा विजय हजारे ट्रॉफीचा थरार चालू आहे. या स्पर्धेतील एक सामना शनिनारी (२० फेब्रुवारी) झारखंड विरुद्ध मध्य प्रदेश यांच्यात पार पाडला. या सामन्यात झारखंडच्या खेळाडूंनी अप्रतिम प्रदर्शन करत तब्बल ३२४ धावांच्या फरकाने सामना खिशात घातला. झारखंडचा संघनायक इशान किशन या सामना विजयाचा शिल्पकार ठरला.
फलंदाजीबरोबर यष्टीमागेही त्याने प्रशंसनीय कामगिरी केली. आयपीएल २०२० मधील दमदार प्रदर्शनापेक्षाही तो अधिक श्रेयस्कर कामगिरी करत असल्याचे दिसत आहे. इशानच्या या कामगिरीमागे माजी भारतीय दिग्गज राहुल द्रविड यांचा मोठा हात आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
राहुल द्रविडच्या सल्ल्यामुळे इशात किशनमध्ये झाले बदल
युवा क्रिकेटपटू इशान गतवर्षीपासून सातत्याने चांगले प्रदर्शन करत आहे यात कसलाही संदेह नाही. संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात त्याने १४ सामन्यात तब्बल ५१६ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याची फलंदाजी सरासरी (५७.३३) वाखाणण्याजोगी होती. यादरम्यान त्याने ४ अर्धशतकेही केली होती. त्याच्या या कमालीच्या प्रदर्शनाचे श्रेय त्याने द्रविडला दिले होते.
‘द वॉल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या द्रविडने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बऱ्याच युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन केले आहे. यात इशानचाही समावेश होतो. द्रविडविषयी बोलताना इशानने सांगितले होते की, “मी द्रविड यांच्याशी माझ्या फलंदाजीबद्दल चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी मला सल्ला दिला होता की, मोठी आकडी खेळी करण्यासाठी मला माझा ऑफ साइडचा खेळ सुधारावा लागेल. त्यानंतर मी माझ्यातील या उणिवेवर काम केले.” याचा परिणाम सर्वांना आयपीएल आणि विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत दिसत आहे.
…नाहीतर इशानने द्विशतकाला गवसणी घातली असती
मध्य प्रदेशविरुद्ध झालेल्या सामन्यात इशानने सलामीला फलंदाजी करताना अवघ्या ९४ चेंडूत १७३ धावांची अफलातून खेळी केली. या खेळासाठी त्याने ११ षटकार आणि १९ चौकार मारले. परंतु २८ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर गौरव यादवने शुभम शर्माच्या हातून त्याला झेलबाद केले. यामुळे द्विशतक करण्यापुर्वी इशानला पव्हेलियनचा रस्ता धरावा लागला.
असे असले तरीही, इशानच्या विस्फोटक खेळीमुळे झारखंडने मध्य प्रदेश संघापुढे ४२३ धावांचे भलेमोठे लक्ष्य उभारले. प्रत्युत्तरात वरुण ऍरॉनच्या दमदार गोलंदाजीमुळे मध्य प्रदेश संघ १९ षटकात अवघ्या ९८ धावांवर गारद झाला. ऍरॉनने ५.४ षटकात ३७ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. तसेच सामना विजयाचा नायक ठरलेल्या इशाननेही यष्टीरक्षणात महत्त्वाची भूमीका बजावली. त्याने यष्टीमागे मध्य प्रदेशच्या ७ फलंदाजांचे झेल पकडले.
महत्त्वाच्या बातम्या-
एकाच दिवसात इशान किशनचा डबल धमाका! सकाळी झळकवले विक्रमी शतक, तर संध्याकाळी झाली भारतीय संघात निवड
तपश्चर्या आली फळाला! तब्बल १२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सुर्यकुमार यादवला भारतीय संघात मिळाले स्थान