माजी भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविड याची भारताच्या अंडर-19 संघात निवड झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी त्यचाचा भारताच्या अंडर-19 संघात समावेश करण्यात आला. समितनं कूचबिहार ट्रॉफीमध्ये कर्नाटकसाठी चेंडू आणि बॅटनं दमदार कामगिरी केली, ज्याचं बक्षीस त्याला मिळालं.
आता समितचे प्रशिक्षक कार्तिक जेसवंत यांनी खुलासा केला आहे की, राहुल द्रविड आणि त्यांनी समितला अनेकदा सांगितलं होतं की त्यानं राहुल द्रविडच्या कीर्तीत हरवून जाऊ नये. त्याच्यासाठी चांगले खेळणे हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना कार्तिक म्हणाले, “समितला त्याच्या वडिलांचा दर्जा माहीत आहे आणि त्याच्यावर खूप दडपण असणार हेही त्याला माहीत आहे. म्हणून राहुल आणि मी त्याला सांगत आहोत की, तू बाहेरच्या कोणत्याही आवाजानं त्रस्त होऊ नको. त्याचं कौशल्य आणि मैदानावरील कामगिरीच्या आधारेच मूल्यमापन केलं जाईल.”
समित द्रविड या महिन्यापासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. सध्या तो कर्नाटकच्या स्थानिक T20 लीग महाराजा ट्रॉफीमध्ये खेळत आहे. मात्र, या लीगमध्ये त्याची कामगिरी तितकीशी चांगली झाली नाही. त्याच्या वेगवान गोलंदाजीचाही संघाला उपयोग झाला नाही. त्याला सात सामन्यांत केवळ 82 धावा करता आल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेटही 114 एवढा राहिला.
या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी समित द्रविडची भारताच्या 19 वर्षांखालील संघात निवड झाली. भारताचा अंडर-19 संघ पुद्दुचेरी आणि चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय आणि 4 दिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.
हेही वाचा –
लॉर्ड्स मैदानावर शतक आणि 5 बळी घेणारे 3 खेळाडू, मानाच्या यादीत एका भारतीयाचाही समावेश
‘विराट कोहली’ समोर बाबर आझम फेलचं! पाकिस्तानी खेळाडूनेच दाखवला आरसा
एकेकाळी आयपीएलची मोठी ऑफर नाकारली, आता खाजगी कंपनीत नोकरी करतो हा क्रिकेटर