भारतीय संघातील दिग्गज फलंदाज राहुल द्रविड यांना ‘द वॉल’ असेही म्हटले जाते. क्रिकेटच्या मैदानात अनेक दिग्गज गोलंदाजांचा घाम काढणाऱ्या राहुल द्रविड यांनी २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. अनेक क्रिकेटपटू निवृत्तीनंतर पुढील आयुष्य आपल्या कुटुंबासोबत घालवण्याचा निर्णय घेतात. तर काही काही क्रिकेटपटू समालोचन क्षेत्रात आपले नशीब आजमावून पाहतात. परंतु राहुल द्रविड यांनी युवा खेळाडूंना घडवण्याचा निर्णय घेतला होता. आता ते लवकरच भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी विराजमान होणार आहेत.
राहुल द्रविड सध्या नॅशनल क्रिकेट ॲकेडिमीचे अध्यक्ष आहेत. तसेच त्यांनी भारतीय अ संघ आणि १९ वर्षांखालील संघाला देखील प्रशिक्षण दिले आहे. यादरम्यान त्यांनी अनेक युवा खेळाडू घडवले आहेत. ज्यांनी पुढे जाऊन भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. गेल्या काही महिन्यांपासून राहुल द्रविड यांना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक करा, अशी मागणी जोर धरू लागली होती. अखेर चाहत्यांच्या मागणीला यश आले आहे. लवकरच राहुल द्रविड भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होणार आहेत.
आगामी श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाची जबाबदारी राहुल द्रविड यांना देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. हा दौरा सुरू असताना विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त असणार आहे. त्यामुळे रवी शास्त्री आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड हे देखील वरिष्ठ संघासोबत इंग्लंडमध्येच असणार आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर सपोर्ट स्टाफ म्हणून राहुल द्रविडसोबत काम केलेल्या सदस्यांना जाण्याची संधी मिळणार आहे. परंतु अद्याप त्यांची नावे पुढे आलेली नाहीत.
या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी येत्या १५ किंवा १६ जूनला संघाची घोषणा करण्यात येऊ शकते. या दौऱ्यावर आयपीएल स्पर्धेत आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी देण्यात येऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
‘रिषभ पंत खूप जास्तच आत्मविश्वासी आहे,’ पाहा असे का म्हणाले न्यूझीलंडचे प्रशिक्षक
‘हिटमॅन’ का अजून कसोटीमध्ये झाला नाही यशस्वी? माजी पाकिस्तानी क्रिकेटरने सांगितले कारण





