भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. चौथ्या डावात ४०७ धावांचे आव्हान मिळाले असताना भारताने चार सत्रात संपूर्ण १३१ षटके खेळून काढत सामना अनिर्णीत राखला. यात आर अश्विन आणि हनुमा विहारी यांनी तर जवळपास अडीच सत्र किल्ला लढवत एकही गडी बाद होणार नाही याची काळजी घेतली. यात विशेषतः हनुमा विहारीने दुखापत झाली असतानाही दिलेली झुंज पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले होते.
अशात माजी भारतीय दिग्गज राहुल द्रविड आणि व्हिव्हिएस लक्ष्मण यांनी विहारीला पर्सनल मॅसेज करत शुभेच्छा दिल्या होत्या. स्वत: विहारीने यासंदर्भात खुलासा केला आहे.
विहारी म्हणाला की, “राहुल आणि लक्ष्मण या दिग्गजांनी सिडनी कसोटीनंतर मला मॅसेज केला होता आणि म्हटले होते की शानदार खेळी केलीस. जेव्हा दिग्गज व्यक्ती तुमच्या प्रदर्शनाची प्रशंसा करतात, त्यावेळचा आनंद खरोखरच खूप वेगळा असतो.”
“तसेच संघ कर्णधार अजिंक्य रहाणे यानेही माझी पाठ थोपटली होती. तो मला म्हणाला होता की, तू केलेली कामगिरी कोणत्या शतकापेक्षा कमी नाही. तुमच्या धावा तुमचे योगदान सांगू शकत नाहीत. कारण ती परिस्थितीच खूप वेगळी होती, जिथे या धावसंख्येपेक्षा अधिक वेळ फलंदाजी करण्याला जास्त मूल्य होते”, असे विहारी पुढे बोलताना म्हणाला.
विहारी-अश्विनने सामना राखला होता अनिर्णित
सिडनी कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात भारतापुढे ४००हून अधिक धावांचे भलेमोठे आव्हान होते. अशात ३६व्या षटकापर्यंत १०० धावा करत भारतीय सलामीवीरांची जोडी आणि कर्णधार रहाणे माघारी परतले होते. परंतु रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांच्या शतकी भागिदारीने संघाचा डाव सावरला होता. मात्र या दोन्ही फलंदाजांची विकेट पडल्यानंतर सामना ऑस्ट्रेलिया संघाच्या हातात आला होता. अशावेळी सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विहारी आणि अश्विनने तब्बल २९८ चेंडू खेळले होते.
यावेळी विहारीने २३ धावा (१६१ चेंडूत) तर अश्विनने ३९ धावा (१२८ चेंडू) केल्या होत्या. फलंदाजी करताना दुखापतग्रस्त असल्याने विहारीला वेदना होत होत्या. तरीही जिद्दीने मैदानावर थांबत सामना अनिर्णित राखण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
बॉर्डर- गावसकर ट्रॉफीवर कोरले गेले भारताचे नाव
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील सिडनी कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर कसोटी मालिका १-१ ने बरोबरीवर होती. त्यानंतर ब्रिस्बेन येथील निर्णायक चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत ३ विकेट्सने ऑस्ट्रेलियाला पराभवाची चारली. यासह मालिकेत २-१ ने आघाडी घेत भारताने तिसऱ्यांदा बॉर्डर- गावसकर ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी मालिकेआधी इंग्लंडच्या कर्णधाराने टीम इंडियावर उधळली स्तुतीसुमने, म्हणाला…
“घरी येताना चांगले कपडे घालून ये”, भारतात परतल्यानंतर रहाणेला बायकोची ऑर्डर, जाणून घ्या कारण
सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी: ‘या’ आठ संघात रंगणार उपांत्यपूर्व फेरी, पाहा संपूर्ण वेळापत्रक