बुधवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठी घोषणा केली आहे. भारताच्या वरिष्ठ पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी माजी दिग्गज कर्णधार राहुल द्रविडची नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्या टी२० विश्वचषक स्पर्धा संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे सुरु आहे. या स्पर्धेनंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अन्य प्रशिक्षकांचा कार्यकाल संपणार आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने या पदांसाठी अर्ज करण्याची जाहीरात केली होती. त्यानुसार द्रविडने अर्ज केला होता. आता त्याची नियुक्ती अधिकृतरित्या करण्यात आली आहे. यापूर्वीच अनेक दिवसांपासून तोच भारताचा पुढील प्रशिक्षक बनेल अशी चर्चा होती.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार सुलक्षणा नाईक आणि आरपी सिंग यांचा समावेश असणाऱ्या सल्लागार समीतीने एकमताने राहुल द्रविडची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता द्रविड अगामी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपासून ही जबाबदारी संभाळेल. न्यूझीलंड संघ टी२० विश्वचषकानंतर टी२० आणि कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याला १७ नोव्हेंबरपासून टी२० मालिकेने सुरुवात होणार आहे.
द्रविडने यापूर्वी भारत अ संघाचे आणि १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले आहे. त्याच्या प्रशिक्षकपदाखाली २०१८ साली १९ वर्षांखालील भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर आत्ताचे अनेक युवा खेळाडू द्रविडच्या प्रशिक्षणाखाली तयार झाले आहेत. द्रविडने याआधी याचवर्षी जून-जुलै दरम्यान श्रीलंका दौऱ्यावर भारताच्या वरिष्ठ संघाचे प्रभारी प्रशिक्षकपद सांभाळले होते. त्यावेळी भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर होता आणि नियमित प्रशिक्षक रवी शास्त्री त्यांच्याबरोबर होते.
द्रविड गेल्या काही वर्षापासून बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत होता. पण, आता त्याच्या जागी बीसीसीआयला नव्या व्यक्तीची नियुक्ती करावी लागणार आहे.
बीसीसीआयने मानले रवी शास्त्रींचे आभार
बीसीसीआयने सध्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री, तसेच गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर यांचे त्यांच्या यशस्वी कार्यकाळाबद्दल आभार मानले असून शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्वांचा कार्यकाळ टी२० विश्वचषक २०२१ नंतर संपणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विजयरथावर स्वार इंग्लंडला हादरा; ‘हा’ प्रमुख खेळाडू झाला स्पर्धेबाहेर
बिग ब्रेकिंग! राहुल द्रविड दिसणार टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी, बीसीसीआयची अधिकृत घोषणा