भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज राहुल द्रविड आता भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडणार आहे. १७ नोव्हेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत द्रविड त्याची जबाबदारी स्वीकारेल. तत्पूर्वी, टी२० विश्वचषकानंतर रवी शास्त्रींचा संघासोबतचा करार संपणार असल्यामुळे द्रविडची या पदासाठी नियुक्ती केली गेली आहे आणि यासाठी त्याला मोठा मोबदला दिला जाणार आहे. मागच्या काही दिवसांपासून द्रविड चर्चचा विषय ठरत आहे. अशात तो आतापर्यंतच्या सर्वाधिक श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक असल्याची माहिती समोर येत आहे.
यापूर्वी भारतीय संघाला चांगले खेळाडू देण्यासाठी द्रविडची महत्वाची भूमिका राहिली आहे. त्याने भारताचे मुख्य प्रशिक्षक पद स्वीकारण्यापूर्वी एनसीए प्रमुखाची जबाबदारी चांगल्याप्रकारे पार पाडली आहे. या पदावर काम करताना त्याने संघासाठी अनेक दिग्गज घडवले आहेत. तसेच त्याने भारताच्या १९ वर्षाखालील संघासाठी मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी देखील पार पाडली आहे.
मिळालेल्या माहितीप्रमाणे, राहुल द्रविड याची एकूण संपत्ती २३ मिलियन डॉलर्स, म्हणजे जवळपास १७२ कोटी एवढी आहे. राहुलला भारताच्या १९ वर्षाखालील संघाला प्रशिक्षण देण्यासाठी दोन वर्षाचे ५ कोटी रुपये देण्याता आले होते. त्यानंतर आता भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर त्याला ही जबाबदारी पार पाडण्यासाठी मोठी रक्कम मिळणार आहे. माहितीनुसार असे समजते की, राहुलला ही जबाबदारी पार पाडण्यासाठी यापूर्वीच्या प्रशिक्षकांपेक्षा दिलेल्या मोबदल्यापेक्षा सर्वाधिक मोबदला दिला जाणार आहे.
त्याच्याकडे अफाट पैसा असला तरी, राहुलला त्याच्या संपत्तीचा गर्व अजीबात दिसत नाही. तो एक शिस्तप्रिय आणि नंम्र स्वभावाचा खेळाडू आहे. त्याला मैदानावर खेळताना राग अनावर झाल्याचे कधीच पाहिले गेले नाही. तो नेहमी शांत आणि संयमी असल्यामुळे त्याला मिस्टर कुल असेही म्हटेले जाते. राहुलला त्याच्या श्रीमंतीचा गर्व नसला तरी, त्याला दर्जेदार जीवन जगायला आवडते. द्रविड बेंगलोरमध्ये एका आलिशान घरात रोहतो, ज्याची किंमत अंदाजे ४ कोटी रुपयांच्या आसपास आहे. याव्यतिरिक्त त्याच्याडे महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे, ज्यामध्ये मर्सिडीज बेंझ, बीएमडब्ल्यू ५ सीरीज तसेच ऑडी क्यू ५ अशा गाड्यांचा समावेश आहे.






