बुधवारपासून (१७ नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू होणार आहे. ही मालिका अनेक गोष्टींमुळे खास आहे. या मालिकेपासून रोहित शर्मा भारताचा नियमित टी२० कर्णधार म्हणून कारकिर्द सुरू करेल, तर माजी कर्णधार राहुल द्रविडसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून ही पहिली मालिका आहे. त्यामुळे या टी२० मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्त्वावर आणि राहुल द्रविडच्या योजनांवर सर्वांचे लक्ष असणार आहे. दरम्यान, या दोघांनी त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल मालिकेपूर्वी खुलासा केला आहे.
रोहितने २००७ साली आयर्लंड विरुद्ध वनडे मालिकेतून द्रविडच्या नेतृत्त्वाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून गेल्या १४ वर्षांत रोहितने मोठी प्रगती केली असून तो सध्या भारताच्या प्रमुख क्रिकेटपटूंपैकी एक आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेपूर्वी पत्रकारपरिषदेत द्रविडने रोहितबद्दल प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ‘याबाबतीत आम्ही काल बसमध्ये बोलत होतो. वेळ पटकन उडून जातो, नाही का? मला अजूनही आठवते, रोहितला मी आयर्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वीपासून ओळखत होतो. आम्ही मद्रासमध्ये (चेन्नई) एक चॅलेंजर स्पर्धा खेळलो होतो.’
तो पुढे म्हणाला, ‘आम्हाला सर्वांना माहित होते, रोहित खास आहे. त्याच्यात एक विशेष प्रतिभा होती, जी आपण पाहू शकतो. इतक्या वर्षांनंतर त्याच्यासोबत मी काम करेन, असे मी कधी विचार केला नव्हता किंवा कल्पनाही केली नव्हती. पण, प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर त्याने गेल्या १४ वर्षांत एक नेता म्हणून, एक व्यक्ती जी प्रगती केली, ती शानदार आहे. त्याने भारतीय खेळाडू म्हणून आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून जे यश मिळवले, जे उल्लेखनीय आहे.’
याबरोबरच द्रविडने असेही म्हटले की, ‘मुंबई क्रिकेटचा आणि भारतीय क्रिकेटचा वारसा चालवणे सोपे नाही, पण त्याने ते सुरेखरित्या केले.’
याशिवाय रोहितनेही त्याची बाजू मांडली. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाबद्दल आठवण सांगितली. रोहित म्हणाला, ‘ही २००७ ची गोष्ट आहे, जेव्हा माझी निवड झाली होती. पण मला त्याच्याशी (द्रविड) बोलण्याची संधी बंगळुरूमधील कँपमध्ये मिळाली होती. तेव्हा ती खूप छोटी चर्चा होती आणि खरंतर मी खूप नर्व्हस होतो. त्यावेळी मी माझ्या वयगटातील लोकांशीही फार बोलायचो नाही, तर बाकी लोकांना तर सोडूनच द्या.’
रोहित पुढे म्हणाला, ‘त्यामुळे मी माझ्या गोष्टी शांततेत करायचो आणि माझा खेळ खेळायचो. पण, हो आयर्लंडमध्ये जेव्हा तो (द्रविड) पहिल्यांदा आला आणि मला सांगितले की मी हा सामना खेळणार आहे, तेव्हा मी खूप आनंदी झालो होतो. नक्कीच ड्रेसिंग रुमचा भाग होणे स्वप्नवत होते.’
‘आता बराच कालावधी उलटला आहे. मी भारताकडून खेळतानाचे आणि मुंबई इंडियन्सकडून खेळतानाचे सर्व क्षण हृदयात जतन केले आहेत. अजून अनेक असे क्षण जगायचे आहेत,’ असे पुढे रोहित म्हणाला.
🎥 Head Coach Rahul Dravid rekindles his first meeting with a young @ImRo45 & lauds the #TeamIndia T20I captain for his contribution towards the Indian cricket. 👏 ☺️#INDvNZ pic.twitter.com/croLaIElLu
— BCCI (@BCCI) November 16, 2021
रोहितला विराट कोहली ऐवजी भारतीय टी२० संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. विराटने न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेपूर्वी भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडले आहे. त्याचबरोबर द्रविडने रवी शास्त्री यांची जागा घेतली आहे. टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेनंतर शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपला. त्यानंतर द्रविडची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलला आयसीसीने दिले ‘हे’ मोठे पद, अनिल कुंबळेची घेणार जागा
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून ट्रेंट बोल्टने ‘या’ कारणाने घेतली माघार